नुकसानग्रस्तांचा कांदा तातडीने खरेदीचे आदेश; खासदार लोखंडे यांचे शेतकऱ्यांकडून कौतुक

नेवासा -जिल्ह्यात झालेल्या अवकाळी व गारपिटीने अकोले, संगमनेर, नेवासा, श्रीरामपूर, राहाता, राहुरी व कोपरगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले असून नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील बळीराजा पुर्णत: खचला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे कृषी अधिकारी व तलाठ्यामार्फत पंचनामे युद्धपातळीवर करण्यात आलेले असतांना ऑनलाईन ई- पिक पाहणी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकांची नोंद झाली नाही.

यामुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामार्फत शेतकऱ्यांच्या कांदा खरेदीला तांत्रिक अडचण दाखविण्यात येवून कांदा खरेदी केली जात नसल्याची लेखी तक्रार शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून केली. त्यानंतर तातडीने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून पणन संचालकांना लेखी आदेश देण्यात आल्यामुळे कांदा खरेदी सुरू झाल्याने खासदार लोखंडे यांचे शेतकऱ्यांतून कौतुक केले जात आहे.

खा. लोखंडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची नुकतीच वर्षा निवासस्थानी भेट घेवून जिल्ह्यात अवकाळी गारपिटीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचे मोठे नुकसान झालेले असून तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी खा. लोखंडे यांनी मुख्यमंञ्यांकडे केली. शिर्डी लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचे मोठे नुकसान झालेले असतांना कामगार तलाठी व कृषी विभागाने पंचनामे करतांना ई- पिक पाहणी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकांची नोंद झाली नाही.

त्यामुळे नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कांदा खरेदी बाजार समिती खरेदी करण्यात आडकाठी आणत असल्याचे वास्तव चित्रण खा. लोखंडे यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर मांडले. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने संबंधित विभागाला आदेश देत कृषी उत्पन्न बाजार समितीला कांदा खरेदी करण्याचे आदेश देत आदेश जुमानाला नाही तर प्रसंगी बाजार समित्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे यावेळी खा. लोखंडे यांनी सांगितले.

तर शेतकऱ्यांची संपर्क कराः खा. लोखंडे
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा कांदा तातडीने बाजार समितीने खरेदी करण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पणन संचालकांना दिलेल्या असून कृषी उत्पन्न बाजार समितीने आदेश पाळला गेला नाही तर तातडीने मला संपर्क करा, असे आवाहनही खा. लोखंडे यांनी शेतकऱ्यांना दैनिक “प्रभात’शी बोलतांना केले.