पिंपरी | अन्यथा भाजपचे अस्तित्व संपून जाईल

पिंपरी, (प्रतिनिधी) – सत्ताधारी भाजपभोवती ठेकेदार व कंत्राटदारांचे कोंडाळे जमा झाले होते. त्यामुळे कामगार, श्रमिक व समाज पक्षापासून कधी दुरावला हे पदाधिकार्‍यांना समजलेच नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला अपेक्षित यश न मिळाले नाही. त्यामुळे आता तरी भाजप पदाधिकार्‍यांनी आपल्या वर्तणुकीत सुधारणा करावी.

नाहीतर याची किंमत भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत मोजावी लागेल, पक्षाचे अस्तित्व संपून पश्चातापाची वेळ येऊ नये, म्हणून वर्तणूक सुधारा, असा घरचा आहेर भाजप प्रणित राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी गुरुवारी (दि.6) भर पत्रकार परिषदेत दिला.

भाजप पदाधिकार्‍यांच्या वर्तणुकीबाबत ते म्हणाले की, पक्षात अनेक चांगले पदाधिकारी आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी घेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या़ंनी पदाचा राजीनामा देऊ केला आहे; मात्र अशा नेतृत्वाची पक्षाला गरज आहे.

तळागाळातील समाज पक्षापासून तुटत चालला आहे, त्याकडे आता लक्ष द्या. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आजही भाजपचे अनेक पदाधिकारी भ्रमात आहेत. ठेकेदारांना सोबत घेऊन देश चालविता येत नाही, तर तळागाळातील समाजालादेखील न्याय दिला पाहिजे. कामगारांच्या विषयाचे ज्ञान असलेली व्यक्ती त्या खात्याचा मंत्री असला पाहिजे. आजही मला श्रमिकांच्या व्यथा मांडण्यासाठी गेली नऊ दहा वर्षांत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळालेली नाही.

मांडलेले महत्वाचे मुद्दे
– कामगार, श्रमिक, शेतकर्‍यांना भाजपने गृहित धरू नये
– तळागाळातील या घटकाच्या वेदना जाणून घ्या
– पक्षावर रोष नाही मात्र, पराभवाच्या कारणांची मिमांसा झाली पाहिजे
– ठेकेदारांना पदाधिकार्‍यांनी बाजूला ठेवावे
– चार महिन्यांत येणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने विचार करावा