‘…अन्यथा सत्तेबाहेर पडू’; अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर संजय शिरसाटांचे वक्तव्य

मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडला तरच त्यांचे स्वागत करू. अन्यथा, शिवसेना सत्तेबाहेर पडले, असे महत्त्वाचे वक्तव्य शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. पवार राष्ट्रवादीच्या 40 आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन करणार, अशी एकच चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे. त्यावर आज पत्रकार परिषदेत शिरसाटांनी भूमिका मांडली.

शिरसाट म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसला विरोध करुनच आम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडली. अशावेळी अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसपासून वेगळे होऊन आमच्यासोबत सत्तेत आले तर त्यांचे स्वागतच आहे. सावरकर, हिंदूत्व आदींबाबत अजित पवार यांना आमची विचारसरणी मान्य करावी लागेल. मात्र, अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासह भाजपसोबत गेले तर शिंदे गट अर्थात शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल.

शिरसाट बोलताना पुढे म्हणाले, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. तेव्हापासूनच अजित पवार अस्वस्थ आहेत. ही अस्वस्था वारंवार दिसून आली आहे. अजित पवार अनेकवेळा नॉट रिचेबल झाले आहेत. महाविकास आघाडीतही उद्धव ठाकरे यांच्यावर अजित पवार नाराज होते.

पवारांचे फोनही उद्धव ठाकरे उचलत नव्हते. याबाबत धनंजय मुंडेंनीही तक्रार केली होती. तेव्हा ते माझे फोन उचलत नाहीत तर तुमचे काय उचलणार?, असे उत्तर अजित पवारांनी दिले होते. हे हवे तर धनंजय मुंडेंना विचारून पाहा, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे.

शिंदे गटावर परिणाम होणार नाही
अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याने शिंदे गटाच्या पोटात गोळा उठला असेल, असे वक्तव्य आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. त्यावर संजय शिरसाट म्हणाले, अजित पवार आमच्यासोबत आल्यास आमच्या ताकदीवर काहीही परिणाम होणार नाही. आम्ही स्वत:चे वेगळे अस्तित्व ठेवत सत्तेत सहभागी झालो आहोत. अजित पवार सोबत आल्यास पुढे वाटचाल कशी करायची, याची रणनिती आम्ही आखू.

शिरसाट आता अधिकृत प्रवक्ते
ठाकरे गटावर आपल्या शैलीने कायमच तोफ डागणारे आमदार शिरसाट आता शिंदे गटाचे अधिकृत प्रवक्ते असणार आहेत. नुकतेच या संदर्भातील पत्र शिरसाट यांना मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरच्या पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते शिवसेनेच्या तिकीटावर सलग तिसऱ्यांदा विधान सभेवर निवडून गेले आहेत.