संतापजनक! केरळमध्ये नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थींनींना अंतर्वस्त्रे काढण्याची जबरदस्ती

नवी दिल्ली : देशात आज नीटची परीक्षा होत आहे. यासाठी देशभरातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थी येत आहे. मात्र केरळमध्ये परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थींनींसोबत अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. केरळमध्ये  विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढण्याची जबरदस्ती करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित विद्यार्थिनींच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर राज्यभरात निषेध व्यक्त करण्यात येत असून राज्य महिला आयोगाने ‘नीट’च्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.

कोल्लममधील मोर्थम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या परीक्षा केंद्रावर हा संतापजनक प्रकार घडला आहे. संबंधित विद्यार्थिनींनी मेटेल हुक असलेले अंतर्वस्त्रे घातल्यामुळे महिला सुरक्षा रक्षकांनी अंतर्वस्त्रे काढा अन्यथा परीक्षेस बसता येणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, विद्यार्थींनी याला विरोध करताच तुम्हाला तुमचं भविष्य महत्वाचं की अंतर्वस्त्रे, असा प्रश्न विचारत सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर अंतर्वस्त्रे काढण्यास जबरदस्ती केली होती.

या प्रकरणी विद्यार्थीनीच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या कृतीमुळे विद्यार्थिनींच्या मनावर आघात झाला असून त्याचा परिणाम परिक्षेवर झाला असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ९० टक्के विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढण्याची जबदस्ती करण्यात आल्याचे तक्रारीत म्हणले आहे. मात्र, महाविद्यालयाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

नीट परीक्षेअगोदर केंद्रावर विद्यार्थ्यांची कसून तपासणी केली जाते. परीक्षा केंद्रावर पाकीट, बॅग, बेल्ट, टोपी, दागिने, बूट, टाचांच्या चपला घालून जाण्यास बंदी आहे. मात्र, केरळमधील परीक्षा केंद्रावर घडलेला हा प्रकार चूकीचा असल्याचे म्हणत नागरीकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.