पाबळ : लॉकडाऊन रद्द होण्याचे संकेत,व्यापाऱ्यांच्या मागणीला प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद

पाबळ (प्रतिनिधी) – येथील छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांनी एकत्र येत व्यापारी वर्गाला विश्‍वासात न घेता लादण्यात येत असलेल्या तसेच चुकीच्या निकषांवर आधारित होत असलेल्या लॉकडाऊनच्या विरोधात शंभरावर अधिक उपस्थित व्यापाऱ्यांच्या बैठकीत व्यथा मांडली.

यावेळी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याशी थेट संपर्क साधण्यात आल्यावर लॉकडाऊन रद्द करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने नुकतेच जाहीर करण्यात आलेले सात दिवसाचे लॉकडाऊन रद्द होण्याचे संकेत मिळाले आहेत. येत्या दोन दिवसांत तशा आशयाचे आदेश दिले जाणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

पाबळ येथील लॉकडाऊनबाबत दैनिक प्रभातने तिसऱ्याचा गाजावाजा अन्‌ लॉकडाऊन लावा या मथळ्याखाली संतप्त व्यापाऱ्यांची व्यथा मांडली होती. तसेच लोकप्रतिनिधींनी याबाबत लक्ष घालावे यासाठी सूचित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेतली गेल्याने बैठकीत व्यापाऱ्यांनी दैनिक प्रभातचे आभार मानले.

दरम्यान, येथील मारुती मंदिरात झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांनी केलेल्या शासन व व्यापारी यांच्यामधील यशस्वी शिष्टाईला यश आल्याने व लादल्या जाणाऱ्या लॉकडाऊनमधून सुटका होणार असल्याने व्यापारी वर्गाने आनंद व्यक्‍त केला.

“करोना कालावधीत व्यापाऱ्यांचे योगदान लक्षात घेऊन यापुढे विश्‍वासात घेऊन निर्णय घेतले जातील. तसेच येत्या दोन दिवसांत व्यापार सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली जाईल. याबाबतीत प्रांताधिकारी व तहसीलदार यांचेशी सकारात्मक चर्चा झाली आहे.
– सविता बगाटे, जिल्हा परिषद सदस्या

“व्यापारी वर्गात लहान मोठे व्यवसायिक आहेत. त्याचा उदरनिर्वाह अडचणीत येत होता. तसेच सततच्या लॉकडाऊनमुळे पाबळचा व्यापारच संपुष्टात, येण्याची चिन्हे दिसत आहेत. याबाबतीत योग्य तो निर्णय घेतला गेल्याने व्यापारी वर्गात समाधान आहे.
– शौकत इनामदार, अध्यक्ष व्यापारी संघ, पाबळ

“ग्रामपंचायतीबाबत हा गैरसमज झालेला आहे. वास्तविक या भागात लसीकरण वेगाने होणे गरजेचे आहे, जिल्हा पातळीवर यामध्ये लक्ष घातले जाणे गरजेचे आहे. त्याबाबतीतही दुजाभाव होत असल्याचे आरोपाला सामोरे जावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.
– मारुती शेळके, सरपंच पाबळ