पद्मश्री डॉ. के.के.अग्रवाल यांचे करोनामुळे निधन

नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर केके अग्रवाल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. के.के.अग्रवाल यांनी सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. केके अग्रवाल 62 वर्षांचे होते आणि जवळपास एक आठवड्यापासून ते व्हेंटिलेटरवर होते.

के.के.अग्रवाल  यांच्या कुटुंबियांनी आज त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ट्वीट करुन त्यांच्या निधनाची माहिती दिली. कोरोनाची लागण झाल्यानंतर केके अग्रवाल यांना राजधानी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. इथे त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. परंतु त्यांना वाचवण्यात अपयश आले.

यंदाच्या जानेवारी महिन्यात केके अग्रवाल यांचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये के.के.अग्रवाल यांच्या पत्नी त्यांना ओरडत असल्याचे  दिसत होत्या. कारमध्ये लाईव्ह व्हिडीओ करतानाके.के.अग्रवाल यांनी आपण कोरोनाची लस घेतल्याचे  सांगितले. हा लाईव्ह व्हिडीओ पाहून त्यांच्या पत्नीने तातडीने फोन करुन माझ्याशिवाय तुम्ही लस का घेतली, अशी विचारणा करत दम भरला. यावर के.के.अग्रवाल यांनी सांगितले की, मी केवळ तिथे लसीची माहिती घेण्यासाठी गेलो होतो आणि मला लस दिली.”

डॉ.के.के.अग्रवाल यांचे यूट्यूब चॅनलही आहे, ज्यावर ते व्हिडीओच्या माध्यमातून कोविड-19 सह इतर आजारांबाबत लोकांना माहिती आणि सल्ला देत असत. डॉ अग्रवाल यांना सुमारे दोन आठवड्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवले होते. डॉ.के.के.अग्रवाल कार्डिओलॉजिस्ट होते आणि हार्ट केअर फाऊंडेशन ऑफ इंडियाचे प्रमुख होते. डॉ. अग्रवाल यांना 2010 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले  होते.