satara | मतदानासाठी कामगारांना पगारी सुटी

सातारा, (प्रतिनिधी)- निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदानादिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. विविध आस्थापनांमधील कामगारांनादेखील या दिवशी भरपगारी सुटी असणार आहे. कामगारांना सुट्टी न देणाऱ्या आस्थापना कारवाईस पात्र ठरतील, असा इशारा सहायक कामगार आयुक्तांनी दिला आहे.

लोकशाहीने दिलेला मतदानाचा मुलभूत अधिकार मतदानाचा हक्क बजावणे नागरिकांचे कर्तव्य आहे. नागरिकांना हा हक्क बजावता यावा, कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मतदानादिवशी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.

या आदेशानुसार निवडणुकीच्या दिवशी सर्व दुकाने, आस्थापने, कंपन्या, निमशासकीय कार्यालये, मंडळे, महामंडळे आदी ठिकाणच्या कामगारांना भरपगारी सुटी जाहीर करण्यात आली आहे. ज्या कामगारांना सुटी मिळणार नाही असे कर्मचारी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात तक्रार करु शकतात, असे त्यांनी सांगितले.