पाकिस्तान : स्वत:ला पैगंबर म्हणवणाऱ्या मुख्याध्यापिकेला फाशीची शिक्षा, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

इस्लामाबाद – मोहम्मद पैगंबरांना अंतिम पैगंबर मानण्यास नकार देत आपण देखील इस्लामची पैगंबर असल्याचे पाकमधील एका महिला मुख्याध्यापिकेने विधान केले आहे. या विधानावरून न्यायालयाने या मुख्याध्यापिकेस फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेत पाच हजर रुपयांचा दंड सुद्धा आकारला आहे.

सलमा तनवीर असे या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. सलमा या लाहोरमधील निश्तर कॉलनीमधील एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. हा पैगंबरांचा अपमान असल्याचे म्हणत एका मौलवीने या महिलेविरोधात याचिका दाखल केली होती.

लाहोरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ही सुनावणी केली असून प्रेषित मुहम्मद यांना इस्लामचा शेवटचा पैगंबर न मानून तन्वीरने त्यांची निंदा केली असल्याचे न्यायाधीश मन्सूर अहमद यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे.

तन्वीरचे वकील मुहम्मद रमजान यांनी असा युक्तिवाद केला होता, की तन्वीरची मानसिक स्थिती ठीक नाही आणि कोर्टाने त्याकडे लक्ष द्यावे, पण न्यायालयाने नकार दिला.

पाकिस्तानात इशनिंदेचा कायदा कडक असून हा कायदा जिया-उल-हक हे सत्तेत असताना आणण्यात आला होता. 1987 पासून आतापर्यंत किमान 1500 लोकांविरोधात या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.