भारताबरोबर चर्चा करण्यास सध्या योग्य वातावरण नाही – पाकिस्तान

इस्लामाबाद – भारताबरोबर चर्चा करण्यासाठी सध्या विधायक वातावरण नाही आणि त्यातून कोणतीही फलनिष्पत्ती होण्याची शक्‍यता नाही, त्यामुळे भारताशी इतक्‍यात द्विपक्षीय चर्चा होणार नाही असे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते असीम इफ्तिखार यांनी गुरुवारी भारताशी संबंधांवरील प्रश्नांना उत्तर देताना वरील वक्तव्य केले.

इफ्तिखार म्हणाले की, या मुद्द्यावर राष्ट्रीय एकमत आहे. त्यांनी सांगितले की, विवादांचे राजनैतिक चर्चेच्या मार्गाने निराकरण करण्याची पाकिस्तानची इच्छा असूनही, सध्या फलदायी किंवा रचनात्मक संवादासाठी योग्य वातावरण नाही.

दोन वर्षांहून अधिक काळानंतर पाकिस्तानने नवी दिल्लीतील उच्चायुक्तालयात व्यापार प्रतिनिधी नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही देशांमधील चर्चेच्या पुनरुज्जीवनाच्या आशा पुन्हा जागृत झाल्या आहेत. तथापि, पाकच्या वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात भारताबाबतच्या व्यापार धोरणात कोणताही बदल करण्यास नकार दिला.

पाकिस्तानात नवीन सरकार स्थापन झाले असून त्यांची भारताबाबतची नेमकी काय भूमिका आहे हे यातून स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानने दहशतवाद पुर्णपणे संपवल्याशिवाय त्यांच्याशी चर्चा करता येणार नाही अशी भूमिका भारताने या आधीच जाहीर केली आहे.