Pakistan Train Accident : पाकिस्तानात मोठा रेल्वे अपघात; 22 जण ठार

कराची – पाकिस्तानातील सिंध प्रांतात एक एक्‍सप्रेस रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात किमान 22 जण ठार झाले आणि 100 जण जखमी झाले आहेत. कराचीवरून रावळपिंडीला जाणाऱ्या हाजरा एक्‍सप्रेसला हा अपघात झाला.

कराचीपासून 275 किलोमीटर अंतरावर नवाबशाह जिल्ह्यामध्ये सरहारी रेल्वे स्टेशनजवळ या एक्‍सप्रेसचे डबे रुळावरून घसरले.

एकूण 22 जण ठार झाल्याच्या वृत्ताला रेल्वेने दुजोरा दिला आहे. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती असल्याचेही रेल्वे मंत्री साद रफिक यांनी माध्यमांना सांगितले.

एक्‍सप्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले असून या अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसल्याचेही त्यांनी सांगितले. 22 मृतांपैकी 15 जणांचे मृतदेह घटनास्थळापासून ताब्यात घेण्यात आले आहेत.

उर्वरित मृतदेह बाहेर काढण्यासाठी पाक लष्कर प्रयत्नशील असल्याचे पाक रेल्वेच्या सुकुर विभागीय व्यवसायिक अधिकारीमोहसीन सियाल यांनी सांगितले. मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत.

मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे लष्कर प्रमुख जनरल असिम मुनीर यांनी सांगितले.

हा अपघात तांत्रिक कारणामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र त्याबद्दल आताच काहीही सांगता येऊ शकणार नाही. सविस्तर तपास केल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.