‘पाकिस्तानात खरी सत्ता असलेल्यांशीच चर्चा केली जाईल…’; इम्रान खान यांची भूमिका

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये खरी सत्ता ज्यांच्याकडे आहे, त्यांच्याशीच चर्चा केली जाईल, असे तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणाच्या सुनावणीनंतर अदियाला तुरुंगात काही निवडक पत्रकारांबरोबर केलेल्या अनौपचारिक वार्तालापादरम्यान इमारान खान यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याशीच आम्ही चर्चा करणार आहोत. राजकीय पक्षांकडे खरी सत्ता नाही. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर यांना निवडणुका नको होत्या, असे पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाज गटाच्या नेत्यांनीच गेल्या वर्षी सांगितले होते, याची आठवणही इम्रान खान यांनी करून दिली.

पाकिस्तानच्या ७५ वर्षांच्या इतिहासात निम्मा काळ लष्करी शासनच सत्तेत राहिले आहे. सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाबाबत लष्कराचे निर्णयच चालतात. अन्य राजकीय पक्षांशी चर्चा करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांना केली आहे.

त्याबद्दल बोलताना आपण मुशर्रफ यांच्या काळात तत्कालिन पंतप्रधान शौकत अझिज यांच्याशीही चर्चा केली नव्हती. केवळ एफआयएच्या चौकशीला उत्तर द्यायला आपण तयार असल्याचे इम्रान खान म्हणाले. मात्र माजी सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांच्या सूचनेनंतर आपल्या पक्षाने इतर राजकीय पक्षांशी निवडणुकीबाबत चर्चा केली होती.

निवडणुका ९० दिवसात व्हायला हव्या होत्या. मात्र बंदियाल यांच्यावर दबाव असल्यामुळे ते निवडणुका घेण्याबाबत आग्रह धरू शकले नाहीत. तत्कालिन पूर्व पाकिस्तान अर्थात बांगलादेश निर्मितीच्यावेळी झालेल्या चुकांबद्दल लष्करी अध्यक्ष याह्या खान यांना आयोगाने जबाबदार धरले होते. त्याच चुका आजही केल्या जात आहेत. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे, असे इम्रान खान म्हणाले.