भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिकांवर कारवाई?; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा

मुंबई – पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना अलीकडेच निलंबित करण्यात आले होते. तथापि, मी नियमबाह्य काम करत नाही म्हणून माझे निलंबन करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला लिहिलेले पत्र व्हायरल झाले आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, भ्रष्टाचारी सरकारने पापाचा कळस गाठला असल्याची घणाघाती टीका केली आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड – प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप, अशा शीर्षकाने काँग्रेसेच ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट केले आहे. महायुती सरकारमध्ये फक्त टेंडर काढण्याची स्पर्धा असते.

जे भ्रष्ट अधिकारी मंत्र्यांच्या आदेशाने नियमबाह्य काम करतात, त्यांचे पूर्ण लाड पुरवले जातात. जे नियमबाह्य काम करत नाहीत, त्यांचा महायुतीतील मुजोर आणि भ्रष्ट मंत्री कसा छळ करतात, त्याचा मोठा पुरावा समोर आला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

पुणे मनपा आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांना पत्र लिहून, निलंबन मागे घेण्यास सांगितले आहे.

मंत्र्यांनी त्यांना बोलवून वारंवार नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव टाकला, ते काम केले नाही म्हणून निलंबनाची कारवाई केली गेली. याबाबत त्यांनी अनेक खुलासे करून संबंधित मंत्र्यावर गंभीर आरोप केले असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.