कोल्हापुरात पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; शहरातील अनेक रस्ते बंद, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर : राज्यात अनेक ठिकाणी  पावसाने धुमाकूळ घातला असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने जोर धरला असून पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. आता ती धोका पातळीकडे हळूहळू सरकत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पुराचे सावट असलेल्या भागातील नागरिकांना सतर्कतेच इशारा महापालिका प्रशासनाने  दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढत चालली आहे. रविवारी पंचगंगा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करत होती. पहाटे तीन वाजता ३९ फूट ही इशारा पातळी पंचगंगेने गाठली. जिल्ह्यातील पाण्याखालील एकूण बंधाऱ्यांची संख्या ८२ इतकी झाली आहे. पुराचे पाणी आल्यामुळे शिवाजी पूल – गंगावेश रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सुतारवाडा, उलपे मळा, कसबा बावडा येथील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तर दुसरीकडे राज्यात विदर्भात मुसळधार पावसाचा जोर कायम असून चंद्रपूर, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यांतील पूरस्थिती कायम आहे. गेल्या १० दिवसांत पुरामुळे किमान १६ जण दगावले असून घरे व शेतीचीही मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे. चंद्रपूरला पुराचा वेढा पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर शहरालगतची इरई नदी ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत आहे.

तर कोकणातही पावसाने जोर धरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १११.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ८०.५ मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी १७९६.६ मि.मी. पाऊस झाला आहे.