Article 370 : “कलम 370 रद्द केल्यापासून काश्‍मीरात शांतता’; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा दावा

श्रीनगर  – केंद्र सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर, जम्मू आणि काश्‍मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली आहे आणि यात केलेल्या सुधारणा कोणत्याही विरोधाशिवाय स्वीकारल्या गेल्या आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

विकासाचे नवे आयाम निर्माण केले जात आहेत, उच्च शिक्षणाच्या संस्था उभारल्या जात आहेत, उद्योगधंदे उभारले जात आहेत. पंचायती राजाची स्थापना झाली आहे आणि तळागाळात अनेक प्रकारच्या प्रशासकीय सुधारणा कोणत्याही विरोधाशिवाय झाल्या आहेत आणि आता काश्‍मीरलाही आपण पुढे जातानाच बघणार आहोत.

अमित शहा आज येथे वितास्ता सांस्कृतिक महोत्सवाला संबोधित करताना बोलत होते. शहा म्हणाले, जम्मू-काश्‍मीरमधील 1,900 आणि केंद्रशासित प्रदेशाबाहेरील 150 कलाकार या सांस्कृतिम महोत्सवात सहभागी झाले आहेत.

केवळ कला, संस्कृती आणि इतिहास देशाला एकत्र करू शकतात आणि येथे आयोजित केलेला महोत्सव हा भारताला एकत्र आणणारा एक अनोखा कार्यक्रम आहे. जिथे देशभरातील खाद्यपदार्थ स्थानिक लोकांना उपलब्ध होतील आणि देशभरातील कलाकार देखील या महोत्सवात सहभागी होतील. काश्‍मिरी जेवणाचा मनमुराद आस्वाद घ्या, असे ते म्हणाले.

शहा म्हणाले की, आपली संस्कृती आणि कलेचा देशाला जोडण्यासाठी जोपर्यंत आपण उपयोग करत नाही, तोपर्यंत आपण आपल्यातील या अभूतपूर्व शक्तीचा वापर देशाच्या हितासाठी करू शकणार नाही. आपली संस्कृती, भाषा, वेशभूषा आणि खाण्याच्या सवयी वेगळ्या असूनही आपण सर्व भारतीय आहोत आणि हे ही आपली मोठी ताकद आहे. जगातील कोणत्याही देशात भारताइतकी विविधता नाही,” असे ते म्हणाले.

शहा म्हणाले की, वितास्ता नदीने (ही नदी आता झेलम म्हणून ओळखले जाते) कठीण काळ पाहिला आहे. ते म्हणाले, या नदीच्या प्रवाहाने रक्त, धर्मांधांचे हल्ले, अनेक शासन बदल पाहिले आहेत आणि झेलम दहशतवादाच्या भीषण संकटाची साक्षीदार बनली आहे.