एकटे राहणाऱ्या माणसांचा दृष्टिकोनच वेगळा; कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने केलेला संशोधनातील निष्कर्ष

वॉशिंग्टन – जगातील मानसशास्त्रज्ञांना नेहमीच मानवी मेंदूचे काम कशाप्रकारे चालते याविषयी आकर्षण असते. गेल्या काही वर्षांमध्ये मानवी संबंध आणि ताणतणाव या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात आले आहे.

आता कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने एकटे राहणाऱ्या माणसांच्या भावभावनांवर संशोधन केले असून या संशोधनाच्या निष्कर्षाप्रमाणे अशा प्रकारे एकटे राहणाऱ्या माणसांचा दृष्टिकोनच वेगळा असतो.

समूहात राहणाऱ्या माणसांपेक्षा त्यांची विचारसरणीही वेगळी असते. हे संशोधन सायकॉलॉजिकल सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. 66 तरुणांच्या मेंदूचा अभ्यास करून हे संशोधन करण्यात आले आहे.

एकटे राहणाऱ्या व्यक्तींची जगाकडे बघण्याची दृष्टी वेगळी असली तरी ज्या तरुणांचा अभ्यास करण्यात आला त्या प्रत्येकाच्या दृष्टीमध्ये सुद्धा फरक जाणवला. म्हणजेच हे सर्वजण एकटे राहत असले तरी त्यांची जगाकडे बघण्याची दृष्टी मात्र समान नव्हती.

प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे जगाकडे पहात होता. पण प्रत्येकाची दृष्टी समूहात राहणाऱ्या माणसांपेक्षा मात्र वेगळी होती. एकट्या राहणाऱ्या माणसांची विचार करण्याची पद्धत एकच असेल असे शास्त्रज्ञांना वाटत होते; पण ते या संशोधनातून समोर आले नाही.

एकटे राहणारा प्रत्येक माणूस वेगळा विचार करू शकतो असेच या संशोधनातून शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. एमआरआय तंत्रज्ञानाचा वापर करून 18 ते 21 वयोगटातील तरुणांचा अभ्यास करण्यात आला.

या सर्व तरुणांना विविध प्रकारचे व्हिडिओ दाखवण्यात आले आणि काही ऑडिओही ऐकवण्यात आले. याशिवाय काही गोष्टी त्यांना वाचण्यासाठी देण्यात आल्या. या प्रत्येक विषयामध्ये या तरुणांनी कशा प्रकारे प्रतिक्रिया दिली होती याचा अभ्यास करून हे सर्व निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.