रस्त्याने मोकाट फिराल तर जागेवरच कोरोना तपासणी आणि आकारला जाईल दंड – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड, (जिमाका) – नांदेड महानगरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी व्यापाऱ्याच्या कोविड चाचणीवर भर दिल्यानंतर आता विविध भागात मोकाट फिरणाऱ्या व्यक्तींवर कायदेशिर कारवाईसाठी सहा पथके नियुक्त करण्यात आले आहेत.

दोषीविरुध्द जागेवरच आर्थिक दंड आकारण्यासाठी हे पथक उद्या दि. 13 एप्रिल 2021 पासून महानगरात  कार्यरत होणार आहे. अशा व्यक्तींमध्ये कुणाबद्दल जर शंका आली तर त्या व्यक्तींची तात्काळ कोरोना टेस्ट करुन त्यांना उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये रवाना केले जाईल असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार यापूर्वी काढलेल्या आदेशानुसार कारवाई केली जाईल.

नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर मोकाट फिरणे टाळून स्वत: व  आपल्या कुटूंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा होणार नाही यांची काळजी घ्यावी असे, आवाहन डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
कारवाईसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक पथकात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

Leave a Comment