satara | लोकांची मानसिकता इंडिया आघाडीला ताकद देण्याची

सातारा, (प्रतिनिधी)- देशातील व राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत लोकांत चांगली जागरुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांची मानसिकता इंडिया आघाडीला ताकद देण्याची असल्याने आमच्या उमेदवाराला सहाही विधानसभा मतदारसंघातून पाठबळ मिळेल,

असा विश्वास आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. आ. शशिकांत शिंदे यांच्या रुपाने इंडिया आघाडीने तगडा उमेदवार दिला असून इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष व संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहेत, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

आ. शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी (ता. १५) साताऱ्यात येणार आहेत. त्याच्या नियोजनासाठी इंडिया आघाडीची बैठक बुधवारी राष्ट्रवादी भवनात झाली. या बैठकीनंतर आ. बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, डॉ. भारत पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर,

प्रभाकर देशमुख, दीपक पवार, हर्षल कदम, डॉ. नितीन सावंत, देवराज पाटील, हिंदूराव पाटील, डॉ. समीर देसाई, राजाभाऊ शेलार, सारंग पाटील, विजय मांडके, मिनाज सय्यद, सचिन मोहिते, अस्लम तडसरकर, शफिक शेख, प्रसाद सुर्वे, ॲड. विजयसिंह पिसाळ, राजकुमार पाटील, नरेश देसाई, धनश्री महाडीक, संजना जगदाळे, संगीता साळुंखे, कविता म्हेत्रे, वनिता भोसले- पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

आ. पाटील म्हणाले, उमेदवारी अर्ज दाखल करताना सोमवारी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी यावे, असे नियोजन केले आहे. उदयनराजे विरोधात असल्याचे आव्हान वाटते का, यावर आमदार पाटील म्हणाले, देशात अनेक ठिकाणी लढती होत आहेत. प्रत्येक ठिकाणी सत्तारुढ विरुध्द विरोधक अशीच लढत आहे.

पण, साताऱ्यातील निवडणूक विचारांवर आधारित आहे. शरद पवारांवर प्रेम करणारी येथील जनता आम्हाला सहकार्य करेल. पाटण, कऱ्हाड दक्षिणमध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळते. याबरोबरच इतर मतदारसंघातही चांगले मतदान मिळणार आहे.

वाईच्या आमदारांची उणीव कशी भरुन काढणार, यावर बाळासाहेब पाटील म्हणाले, लोकांनी आपापली मते तयार केली आहेत. असे कधीही घडलं नव्हते ते मतदार आमच्या बाजूला असतील. बऱ्याच काळानंतर सगळे पक्ष एकत्र येत असून आता आमची ताकद वाढत जाणार असून सहाही मतदारसंघात पाठबळ मिळेल. अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार येणार असल्याने लोक उत्स्फूर्तपणे येतील.

डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ही निवडणूक लोकशाही राहणार की नाही हे ठरविणारी आहे. जातीयवादी, धर्मांध शक्ती राहणार का, लोकशाही आणि राज्य घटना जिवंत राहण्याचा मुद्दा पुढे आहे. स्त्रियांवर, अल्पसंख्यांकावर होणारे अत्याचार असे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. उमेदवार कोण याची चर्चा नाही. दोन विचार व दोन राज्यपध्दतीत चर्चा होणार आहे.

सातारची लढाई शरद पवार विरुध्द मोदी अशी म्हणायची का, यावर डॉ. पाटणकर म्हणाले, ही जातीयवादी धर्मांध शक्ती आणि कार्पोरेट भांडवलशाही यांच्याविरोधात शेतकरी, कामगार, स्त्रिया व अल्पसंख्यांक याची लढाई असेल. डॉ. सुरेश जाधव म्हणाले, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा सातारा जिल्हा बालेकिल्ला आहे, काँग्रेसनेही त्यांना पाठींबा दिला आहे.

सुनील माने यांच्या नाराजीची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने सातारा लाेकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांना उमेदवारी न मिळता आ. शशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाल्याने सुनील माने नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

गुरुवारी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीलाही ते अनुपस्थित होते. सुनील माने यांची पक्षाकडून समजूत काढण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.