पेरुगेट चौकीला कुलूप; आरोपी अर्धा तास दारात, नागरिक संतप्त

पुणे – तरुणीवर वार करणाऱ्या शंतनू जाधवला स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि नागरिकांनी पकडून ठेवले. यानंतर समोरच असलेल्या चौकीत त्याला नेण्यात आले. मात्र चौकीला चक्क कुलूप होते. आक्रमक झालेल्या आरोपीला संभाळत काहींनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला, मात्र पोलीस तब्बल अर्धा तास उलटल्यावर दाखल झाले. यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला होता. या घटनेची दखल घेण्यात आल्याची माहिती उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिली.

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही आरोपीला घेऊन दोन मिनिटांच्या अंतरावरच असलेल्या पेरुगेट चौकीत पोहोचलो. तेथे पहातो तर चौकीला चक्क कुलूप होते. सकाळचे दहा वाजले असतानाही चौकी बंद होती. आमच्या ताब्यात आरोपी होता. आम्ही त्याला कसेबसे नियंत्रणात आणले होते. तर दुसरीकडे स्थानिक नागरिक आक्रमक होऊन त्याला मारण्यासाठी धावत होते. काहींनी कुंड्या, दगड आणि मिळेल त्या वस्तूने त्याला मारले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल, अशी भीती आम्हाला वाटत होती.

यातील काही नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला खबर दिली होती. मात्र दहा मिनिटे झाले, वीस मिनिटे झाले तरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते. नागरिकांच्या हातून काही विपरित घडेल अशी आम्हाला भीती वाटत होती. आम्ही नागरिकांपासून कसेबसे आरोपीला बाजूला घेतले होते. मात्र किती वेळ ही कसरत करणार हा प्रश्‍न होता. अखेर अर्धा तास उलटल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चौकी उघडल्यानंतर आम्ही आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देऊन सुस्कारा टाकला यासंदर्भात पोलीस उपायुक्त (परिमंडळ 1) यांना विचारणा केली असता, त्यांनी ही बाब मान्य करत, आम्ही दखल घेतली आहे. योग्य ती कार्यवाही होईल असे सूचक उत्तर दिले.