“पेट्रोलचे दर स्वतःच्या जबाबदारीवर पाहावेत, छातीत कळ आल्यास…”; अहमदनगरच्या ‘या’ पेट्रोल पंपाची सोशलवर जोरदार चर्चा

अहमदनगर : देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना रोज बसतो. याच इंधनदर वाढीच्या एका पाटीने सोशल मीडियावर चर्चा रंगवली आहे. अहमदनगर शहरातील नेवासकर पेट्रोल पंपावर लावण्यात आलेली एक पाटी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.

‘पेट्रोलचे दर स्वत:च्या जबाबदारीवर पाहावेत, छातीत कळ आल्यास पंप मालक जबाबदार नाही,’ अशी पाटी पंपावर लिहिण्यात आली आहे. या पाटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला हजारो लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. अहमदनगरमध्ये आज पेट्रोलचा दर 120 रुपये प्रति लिटर इतका आहे.

पेट्रोल पंपावरील कर्मचारी रसिकलाल बोरा यांनी हा बोर्ड लिहिला आहे. मागील अनेक वर्षांपासून ते पंपावर दररोज वेगवेगळे बोर्ड लिहितात. कधी सुविचार तर कधी चारोळी ते लिहितात.  दरम्यान, देशात महागाईनं उच्चांक गाठला आहे. इंधन दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल आणि डिझेलने कधीच शंभरी पार केली आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर भार पडत आहे.

देशात सध्या सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्टब्‍लेयरमध्ये विकले जात आहे. तर सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याने त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवरही झालेला आहे.