पिंपरी चिंचवड : स्वयंघोषित माथाडी नेत्यांचा आता नागरिकांनाही त्रास

पिंपरी – उद्योगनगरी म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या शहरातील उद्योजकांकडून माथडी नेते वसुली करत असल्‍याचे अनेक प्रकार उघडकीस आले. परंतु ही कृत्‍ये थांबण्याएवजी स्वयंघोषित माथाडी नेते शहरातील उच्‍चभ्रू सोसायट्यांमध्ये देखील शिरत आहेत. शहरातील उच्चभ्रू रहिवासी सोसायटीत व व्यवसायिक कॉम्पलेक्समध्ये भाडेकरूंकडून स्वयंघोषित माथाडी नेते पैसे घेत आहेत. पैसे न दिल्यास भाडेकरूंना मारहाण केल्‍याचेही प्रकार घडले आहेत. या स्वयंघोषित माथाडी नेत्यांनी राजकीय पाठबळ असल्याचे सांगितले जात आहे.

पिंपळे सौदागर, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, रहाटणी, चिंचवड आदी भागातील अनेक उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये, व्यवसायिक कॉम्पलेक्समध्ये श्रीमंतांनी मोठी गुंतवणूक केलेली आहे. त्यावेळी येथे भाड्याने राहणाऱ्यांची किंवा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अकरा महिन्याच्या करारावर फ्लॅट भाड्याने दिले जात असल्याने त्यानंतर भाडेकरूंना नवीन फ्लॅट शोधावा लागतो, त्यामुळे एजंटलाही सोन्याचे दिवस आले आहेत. मात्र, घरसामान किंवा दुकानाचे सामान्य शिफ्टींग दरम्यान संबंधितांची मोठी आर्थिक लूट होत आहे.

काही वर्षांपूर्वी वाकड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक निरीक्षकाचे काळेवाडी येथील एका सोसायटीतून घरसामान शिफ्टींग दरम्यान या माथाडी नेत्यांनी चार हजारांची मागणी केली, पैसे न दिल्यास टेम्पो सामानासह जाळून टाकण्याची धमकी दिली. मात्र हे सामान पोलीस अधिकाऱ्याचे असल्याचे कळताच तेथून पळ काढला. त्यावेळी अधिकाऱ्याला त्यांच्या मोटारीचा धक्का बसला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून माथाडी नेत्याला अटक केली असता तो सराईत गुन्हेगार निघाला. त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. इतक्‍या दिवसांनंतरही हे प्रकार अद्याप थांबले नाहीत.

खंडणी वसुलीची पद्धत
घरसामान शिफ्टींगच्या वेळी किंवा नवीन साहित्य आणल्यानंतर सोसायटीतील सुरक्षारक्षक या माथाडी नेत्यांना खबर देतात. घरसामान शिफ्टींग होत असताना या नेत्यांचे बगलबच्चे तेथे येतात. “आम्ही माथाडी कामगार आहोत, आम्हाला न विचारता दुसऱ्या व्यक्तीला कसे काम दिले, आम्हालाही पैसे द्या.” असे म्हणत तीन ते चार हजारांची मागणी करतात. भाडेकरूला याबाबत काहीच माहिती नसते. तोपर्यंत हे माथाडी नेतेही मोटारीतून तेथे दाखल होतात. “आम्ही माथाडी नेते आहेत” असे म्हणत पैसे देण्यासाठी धमकी देत गोंधळ घालतात. भाडेकरू घाबरून त्यांना पैसे देऊन टाकतो.

भाडेकरूने पैसे देण्यास टाळल्यास केल्यास कामगारांना किंवा टेम्पो चालकालाही मारहाण केली जाते. पैसे मिळाल्यावर खबर देणाऱ्या सुरक्षारक्षकाला त्याचे कमिशन दिले जाते. कधीकधी या प्रकारात टेम्पोचालक किंवा घरसामान शिफ्टींग करणारे कामगार सहभागी असतात. त्यांनाही कमिशन मिळते. व्‍यावसायिक काॅम्‍पलेक्‍सच्‍या आसपास माथाडी नेत्‍यांचे हस्‍तक आपले बस्तान बसवितात. कॉम्पलेक्समध्ये एखादी गाडी साहित्य घेऊन गेली की तो माथाडीचे पदाधिकारी पावती पुस्तक घेऊन आत जाऊन पैशांची मागणी करतात. असे प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे.

साहित्य आम्ही भरणार किंवा उतरणार यासाठी माथाडी कामगार कामाची मागणी करू शकतात. परंतू, माथाडीची नावाखाली कोणी खंडणी वसूल करत असेल, याबाबत खंडणी विरोधी शाखेला अर्ज दिल्यास तात्काळ संबंधितांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच असे प्रकार घडत असले त्यावेळी नागरिकांनी किंवा संबंधित भाडेकरूंनी ११२ या क्रमांकावर पोलिस कंट्रोल रूमला कळवावे.
– सतीश माने, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस.