पिंपरी चिंचवड : ‘एलएच’ मालिकेसाठी भरावे लागणार तीनपट शुल्‍क ! अर्ज करण्याचे आरटीओचे आवाहन

पिंपरी – पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत सुरू होणाऱ्या दुचाकी वाहनांच्‍या ‘एलएच’ मालिकेसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक हवा असल्‍यास तीनपट शुल्क भरावे लागणार आहे. चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांक दुचाकींसाठी ठेवण्याबाबत आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया आरटीओकडून सुरू करण्यात आली आहे. नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील अशा चारचाकी वाहन मालकांनी 17 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक दुचाकी वाहनांसाठी आरक्षित करण्यासाठी 18 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी अडीच वाजता विहित नमुन्यात अर्ज सादर करावा, असे आवाहन आरटीओने केले आहे.

चारचाकी वाहनांसाठी क्रमांकांची यादी 18 जानेवारी रोजी सकाळी कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असल्यास 18 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा लागणार आहे. त्‍

याच दिवशी दुपारी 3.30 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधीत अर्जदारांसमोर लिफाफे उघडण्यात येतील. शुल्कापेक्षा जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्या अर्जदारास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे. दुचाकीची यादी 19 जानेवारी रोजी कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही. आकर्षक क्रमांकाचे शुल्कामध्ये बदल झाल्यास त्याप्रमाणे विहीत केलेले शुल्क लागू करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सांगितले.