पिंपरी वाहतूक पोलिसांची अनधिकृत रिक्षांवर कारवाई

पिंपरी – पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अनधिकृत रिक्षांवर पिंपरी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या चौकातील रिक्षा इतर वाहनांना अडथळा ठरत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यामुळे, चौकातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी अनधिकृत रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई बडगा उगारला आहे.

निगडी ते दापोडी या मुख्य मार्गावरील पिंपरी चौकाच्या दोन्ही बाजूला अनधिकृत रिक्षा उभ्या असतात. या मुख्य मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झालेला आहे. या मार्गवरच पीएमपी बस थांबा व बाजूला अनधिकृत रिक्षा थांबत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या वाहनांना शिस्त लागण्यासाठी व वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जॅमरची कारवाई केली.

तसेच, पिंपरी चौकात अनेक हातगाडीधारक अनधिकृतरित्या थांबत असल्याने पादचारी व वाहनांना अडथळा निर्माण होतो. या रस्त्यावर कित्येकदा अपघात होऊन वादावादीचे प्रसंगही घडतात. यामुळे, महापालिकेच्या संबंधित विभागाने अनधिकृत हातगाडीधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.

“पिंपरीतील चौकात मेट्रोचे काम सुरु असल्याने मुख्य रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे, चौकात सकाळी व सायंकाळच्या सुमारास वाहतूक कोंडी होते. वाहतूक सुरळीत होण्यासाठी चौकाच्या दोन्ही बाजूच्या अनधिकृत रिक्षांवर कारवाई सुरु आहे. याचबरोबर, चौकामध्ये वाहतूक पोलिसांची नेमणूक केली असून वाहतूकीला शिस्त लागण्यासाठी अनधिकृत वाहनांवर कारवाई सुरु राहणार आहे. तसेच, नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्‍यक आहे.
-संतोष पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग पिंपरी

Leave a Comment