पिंपरी : दोन महिन्यांपासून केशरी कार्डधारक धान्यापासून वंचित

पिंपरी (प्रतिनिधी) – केशरी कार्डधारकांना (एपीएल) मे आणि जून महिन्यात गहू, तांदुळ मिळाले. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात शासनाकडून धान्य आलेले नाही. पर्यायाने, त्याचे वाटपही झालेले नाही. त्याशिवाय, अन्नसुरक्षा व अंत्योदय योजनेतील डाळीचेही वाटप दोन महिन्यांपासून रखडले आहे.

“करोना’मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने धान्य देण्याची कार्यवाही 1 मे पासून सुरू करण्यात आली. मे आणि जून महिन्याचे धान्य वाटप झाले. शहरातील सुमारे 1 लाख 42 हजार कार्डधारकांनी त्याचा फायदा घेतला. शहरामध्ये चिंचवड विभागातंर्गत 73 हजार 487 कार्डधारकांना 93 स्वस्त धान्य दुकानांतून तर, पिंपरी विभागातंर्गत 68 हजार 927 कार्डधारकांना 77 स्वस्त धान्य दुकानांतून हे धान्य वाटप करण्यात आले.

“केशरी कार्डधारकांना वाटपासाठी आवश्‍यक मासिक नियतनातील गहू आणि तांदूळ शासनाकडून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मिळालेले नाही. अन्नसुरक्षा व अंत्योदय योजनेतील रेशनकार्ड धारकांना वितरित करावयाची डाळही मिळणे बाकी आहे. त्यामुळे संबंधित धान्यांचे वाटप झालेले नाही. शासनाकडून नियतन मिळाल्यानंतर त्याचे रास्त भाव धान्य दुकानांतून वाटप सुरू केले जाईल.”
– दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी (निगडी)

केशरी कार्डधारकांना 8 रुपये किलो गहू आणि 12 रुपये किलो तांदूळ या दराने शहरातील रास्त भाव धान्य दुकानातून वाटप झाले. केशरी कार्डधारकांच्या कुटुंबातील प्रति व्यक्ती 2 किलो तांदूळ आणि 3 किलो गहू असे वाटप केले. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये मात्र शासनाकडूनच गहू आणि तांदूळ न आल्याने त्याचे वाटप रखडले आहे. केशरी कार्डधारक त्यासाठी सातत्याने रेशनिंग दुकानदारांकडे विचारणा करीत आहेत. त्यावरून त्यांचे दुकानदारांशी वादविवाद देखील होत आहेत.

डाळ वाटपासाठीही प्रतीक्षा…

शासनाकडून अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थी राशनकार्ड धारकांना एप्रिल, मे आणि जून अशा तीन महिन्यांमध्ये 1 किलो तूरदाळ किंवा चणाडाळ वितरित करण्यात आली. जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये मात्र डाळीचे वाटप झालेले नाही. सप्टेंबरमधील वाटपासाठी देखील अद्याप शासनाकडून डाळ मिळालेली नाही. त्यामुळे डाळीचे वाटप रखडले असल्याचे ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता यांनी सांगितले.

Leave a Comment