पिंपरी : ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरात ‘करोना’चा धुमाकूळ

सर्वाधिक 173 उपचाराधीन रुग्ण : शहरात एकूण 65 प्रतिबंधित क्षेत्र

पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून “करोना’ने शहराला रोज धक्‍के देत आहे. महापालिकेच्या “अ’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या परिसरात तर “करोना’ने अक्षरशः धुमाकूळ घातला आहेत. बुधवारी (दि. 27) दुपारपर्यंत या परिसरात तब्बल 173 करोनाचे उपचाराधीन रुग्ण होते. तसेच एक-दोन अपवाद वगळता शहराच्या काना-कोपऱ्यात “करोना’ने शिरकाव केला असल्याने शहरात सध्या 65 प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. तर 34 परिसर प्रतिबंधित क्षेत्रातून मुक्‍त झाले आहेत.

सर्वात कमी सक्रिय रुग्ण हे “क’ आणि “ह’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत प्रत्येकी सहा इतके आहेत. एकूण 65 कन्टेन्मेंट झोनपैकी “अ’ आणि “ई’ प्रभागातंर्गत सर्वाधिक प्रत्येकी दहा कन्टेन्मेंट झोन सध्या आहेत.

“अ’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत परिसर करोनाचा “हॉटस्पॉट’ ठरला आहे. या भागात प्रामुख्याने आनंदनगर, भाटनगर, बौद्धनगर आदी झोपडपट्ट्यांचा परिसर आहे. या झोपडपट्ट्यांमध्ये करोनाचा सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्याशिवाय, या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिंचवडस्टेशन, पिंपरी कॅम्प, आकुर्डी गावठाण, मोरवाडी, निगडी आदी परिसराचाही समावेश होतो. या प्रभागात एकूण 189 रुग्ण होते. 16 जणांना उपचार करून घरी सोडले आहे.

“क’ आणि “ह’ मध्ये कमी रुग्ण
“क’ आणि “ह’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत परिसरात सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी सहा सक्रिय रुग्ण आहेत. “क’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत खराळवाडी, मोशी, चिखली, इंद्रायणीनगरचा समावेश होतो. या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एकूण 33 रुग्ण होते. त्यातील 25 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर, दोघांचा मृत्यू झाला. “ह’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, सांगवी आदी भाग येतो. येथे 21 रुग्ण होते. त्यातील 15 रुग्ण बरे झाले. तर, सध्या 6 सक्रिय रुग्ण आहेत.

Leave a Comment