वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर पित्रोदा यांचा राजीनामा; जयराम रमेश यांची माहिती

नवी दिल्ली – वर्णावरून केलेल्या टिप्पणीमुळे वादात सापडलेले ओव्हरसिज कॉंग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी राजीनामा दिला आहे. कॉंग्रेस पक्षाकडून त्यांचा राजीनामा ताबडतोब स्विकारण्यात आला. कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनीच सोशल मीडियावरून याची माहिती दिली.

पित्रोदा यांनी आपल्या मर्जीने राजीनामा दिला असून कॉंग्रेस अध्यक्षांनी तो स्विकारला असल्याचेही रमेश यांनी म्हटले आहे. दरम्यान, पित्रोदा काय म्हणाले यापासून पक्षाने अगोदरच स्वत:ला लांब ठेवले होते. पक्षातल्याच काही नेत्यांनी विशेषत: इशान्य भारतातील नेत्यांनी या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

लोक अजुनही आमच्यासंदर्भात भेदभावाच्या भावनेने ग्रासले असल्याचे या प्रकारावरून दिसून येते असे मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॉड संगमा यांनी म्हटले होते. पित्रोदा यांच्यामुळे इशान्य भारत आणि अन्य भागांतील अनेक लोकांच्या भावनांना धक्का बसला असल्याचे ते म्हणाले.