प्रचारात ‘प्लॅस्टिकबंदी’ला हरताळ

‘युज ऍण्ड थ्रो ग्लास’, ‘पाणी पाऊच’चा वापर मोठ्या प्रमाणात

पिंपरी –“प्लॅस्टिकबंदी’ चा निर्णय झाल्यापासून व्यापाऱ्यांनी प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर कमी केल्याने प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग आटोक्‍यात आल्या आहेत. परंतु सध्या निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडून “प्लॅस्टिकबंदी’ ला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. सध्या प्रचारासाठी बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांसाठी आणि सभेत आलेल्या नागरिकांसाठी पाण्याचे पाऊच आणि “यूज ऍण्ड थ्रो’ प्लॅस्टिकच्या ग्लासचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे. “प्लॅस्टिक ग्लास’ आणि “पाणी पाऊच’ चा वापर आणि विक्री सर्रास सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.

दोन वर्षांपूर्वी पर्यावरणासाठी शासनाने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला. परंतु अद्याप जनसामान्यांची मानसिकता बदलेली नाही. बाजारात खरेदीसाठी जाताना घरुन कापडी पिशवी घेऊन जाण्याची सवयच बंद झाल्यामुळे, आजही कॅरीबॅग नाही का? असे सहज ग्राहक विचारतात. मागील काही दिवसापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्लॅस्टिक कॅरीबॅग वापरणाऱ्या व्यावसायिकांवर कडक कारवाई केल्याने बहुतांश व्यापाऱ्यांनी आता कॅरीबॅगचा वापर बंद केला आहे. त्यामुळे, सध्या तरी कॅरीबॅगचा वापर नियंत्रणात आला असल्याचे दिसते.

मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील किरकोळ दुकानातील प्लॅस्टिकचा वापर 50 ते 60 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. कॅरीबॅगचा स्वस्त आणि सहज पर्याय अद्याप सापडलेला नसला तरी विक्रेत्यांनी कागदी पिशव्या तसेच कागदी रद्दीचा वापर सुरु केलेला पहायला मिळत आहे. एकीकडे कॅरीबॅगचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न होत असतानाच पाणी पाऊच, प्लॅस्टिक ग्लास, पत्रावळी, द्रोण, थर्माकॉलच्या साहित्याचा वापर तसेच या साहित्यांची विक्री आणि उत्पादनावर कोणताच परिणाम झालेला दिसत नाही.

प्लॅस्टिक ग्लास, पाणी पाऊच आणि पत्रावळीचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो. कोणत्याही दुकानात सहजपणे प्लॅस्टिक ग्लास विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्लॅस्टिक ग्लास, पाणी पाऊच आणि थर्माकॉलचा सर्रास वापर होत असताना याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून होत आहे.

प्रचाराने विद्रुपीकरण – प्रचाराचा आता दुसरा टप्पा सुरु असल्याने मतदारांच्या गाठीभेटी घेऊन प्रत्यक्ष मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक प्रयत्न करीत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात घरोघरी प्रचार सुरु आहे. शहरात प्रचार करताना उमेदवारांच्या अतिउत्साही समर्थक काही ठिकाणी घरांच्या भिंतींवर, दरवाजांवर, सोसायट्यांमधील प्रत्येक सदनिकेच्या दारावर, लिफ्टमध्ये उमदेवारांचे चिन्ह व फोटो असलेले स्टिकर चिटकावत आहेत.

या पाठोपाठ जर प्रतिस्पर्धी उमेदवाराचे समर्थक आल्यास ते त्या स्टिकरवर आपले स्टिकर लावत आहेत. यामुळे नागरिकांना आपल्या दरवाजावरील स्टिकर्स काढणे अवघड जात आहे. तसेच दरवाजे, भिंती देखील घाण होत आहेत. त्यामुळे, घर, सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण होत असल्याने मतदारांतून संताप व्यक्त होत आहे.

Leave a Comment