पीएम मोदी म्हणाले- PSUs वरील लोकांचा विश्वास वाढला, 2014 पासून सरकारी कंपन्यांची नेटवर्थ 78% वाढली

Prime Minister Narendra Modi On PSUs -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान राज्यसभेत केलेल्या भाषणात, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांवरील (PSUs) वाढत्या विश्वासाबद्दल प्रशंसा केली. काँग्रेस सरकारने त्यांच्या कार्यकाळात पीएसयू क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याची टीकाही त्यांनी केली. 2014 पासून या PSUs कंपन्यांच्या नेट वर्थमध्ये 78 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले. त्यांचे शेअर्स आता अनुकूल परतावा देत आहेत. (Public Sector Undertakings)

2014 पासून त्यांच्या सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकताना पीएम मोदी म्हणाले, “पीएसयू कंपन्यांची निव्वळ संपत्ती (Net worth) 17 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. 2014 मध्ये ही निव्वळ संपत्ती 9.5 लाख कोटी रुपये होती. याशिवाय, “2014 पासून, PSUs ची संख्या 234 वरून 254 पर्यंत वाढली आहे.”

आकडेवारीनुसार, प्रत्येक तीन PSU शेअर्सपैकी एकाने गेल्या वर्षी 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्यामुळे BSE PSU निर्देशांक 95 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. शिवाय, गेल्या पाच वर्षांत BSE PSU निर्देशांक 169 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

तत्पूर्वी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही ठळकपणे सांगितले होते की, सरकार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे मूल्यांकन वाढविण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, सरकारी मालकीच्या कंपन्यांनी त्यांच्या खाजगी स्पर्धकांना सवलत देऊन व्यवहार केले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांनी हे अंतर कमी केले आहे.

अर्थमंत्री म्हणाल्या, “आम्ही त्यांचे मूल्यांकन कायम ठेवण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.” जर तुम्ही आज सूचीबद्ध सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि त्यांचे बाजार मूल्यांकन पाहिले तर तुम्हाला दिसेल की, शेअर्सच्या किमती वाढल्या आहेत आणि लाभांशात लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्यामुळे निर्गुंतवणूक हा देखील एक पैलू आहे. परंतु आमचे उद्दिष्ट त्यांचे मूल्य वाढवणे आणि बाजारातील अनुकूल भावना सुनिश्चित करणे हे आहे.”

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ञांचा सल्ला घ्या.)