राजू श्रीवास्तव यांची प्रकृती नाजूक ! PM मोदींनी कुटुंबीयांना फोन करत दिले मदतीचे आश्वासन

 

दिल्ली – कॉमेडियन स्टार राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या दोन दिवसानंतरही त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी शिखा यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यासोबतच पंतप्रधानांनी कुटुंबियांना मदतीबाबत देखील आश्वासन दिल असल्याचे वृत्त एका इंग्रजी वाहिनीने दिले आहे.

राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर असून त्याच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झालेली नाही. दिल्लीतील एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजू श्रीवास्तव यांना गेल्या ४६ तासांपासून शुद्ध आलेली नाही आणि त्यांच्या मेंदूला इजा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

58 वर्षीय स्टँड-अप कॉमेडियनला बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .त्यानंतर रुग्णालयात त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील साउथ एक्स्टेंशन येथील कल्ट जिममध्ये ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आला होता त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

याशिवाय पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांशी बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असल्याचे देखील समोर आले आहे. मनोरंजन जगतात सक्रिय असलेले राजू श्रीवास्तव यांनी 2005 मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या स्टँड-अप कॉमेडी शोच्या पहिल्या सत्रात भाग घेतल्यानंतर ओळख मिळवली. ते यूपी फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष देखील आहेत.