पंतप्रधान मोदींनी केलं अर्जेंटिनाच्या खेळाचं कौतुक; म्हणाले, “मेस्सीचे लाखो भारतीय चाहते खुश झाले..’

नवी दिल्ली – कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना गतविजेता फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात लुसेल स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्याच्या शेवटच्या क्षणी पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा ४-२ अशा फरकाने पराभव करत ३६ वर्षानंतर फिफा विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ २-२ अशा बरोबरीत राहिले. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत पोहोचला.

या अगोदर दोन्ही संघांनी फिफा विश्वचषक ही स्पर्धा दोनदा जिकंलेली आहे. गतविजेत्या फ्रान्सने १९९८ आणि २०१८ मध्ये विजेतेपद जिंकले होते. तर दुसरीकडे अर्जेंटिनाने १९७८ आणि १९८६ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले होते. गेल्या अनेक दशकांपासून उराशी बाळगलेलं स्टार फुटबॉलपटू मेस्सीचं स्वप्न पूर्ण झालं आणि जगभरातील त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

दरम्यान, अर्जेंटिनाने फिफा विश्वचषकाचे जेतेपद पटकावल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रविवारी रात्री सोशल मीडियावर ट्विट करत अर्जेंटिनाचे अभिनंदन केले. हा अंतिम सामना फुटबॉलमधील सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक म्हणून लक्षात राहील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आपल्या ट्विट मध्ये पंतप्रधान म्हणतात की, “हा आतापर्यंतचा सर्वात रोमांचक फुटबॉल सामना म्हणून लक्षात ठेवला जाईल! फिफा विश्वचषक चॅम्पियन बनल्याबद्दल अर्जेंटिनाचे अभिनंदन! त्यांनी संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. अर्जेंटिना आणि मेस्सीचे लाखो भारतीय चाहते आहेत. तसेच हा विजय साजरा करत आहे.” असं ते म्हणाले.

यासोबतच पंतप्रधान मोदींनी फ्रान्सच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दलही त्यांचे अभिनंदन केले. “फिफा विश्वचषकातील उत्साही कामगिरीबद्दल फ्रान्सचेही अभिनंदन. त्यांनी आपल्या कौशल्याने आणि खेळाडू वृत्तीने फुटबॉल चाहत्यांची मने जिंकली’. असं देखील पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.