स्वर्णिम भारताची होतेय पायाभरणी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – स्वर्णिम भारताची आज कोट्यवधी भारतीय नागरीक पायाभरणी करत आहेत. राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपली प्रगती दडलेली आहे. राष्ट्र आपल्यापासून अस्तित्वात आहे आणि राष्ट्रापासूनच आपले अस्तित्व आहे. नवीन भारताच्या निर्मितीमध्ये ही जाणीव भारतीयांची सर्वात मोठी ताकद बनत आहे, असे वक्तव्य ब्रह्मा कुमारींनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आज पंतप्रधान मोदींनी नागरिकांना संबोधित करताना केले.

आज आपण अशी व्यवस्था निर्माण करत आहोत ज्यामध्ये भेदभावाला जागा नाही. समता आणि सामाजिक न्यायाच्या पायावर भक्कमपणे उभा असलेला समाज आम्ही निर्माण करत आहोत. ज्याचा विचार आणि दृष्टीकोन नाविन्यपूर्ण आहे आणि ज्याचे निर्णय प्रगतीशील आहेत, अशा भारताचा उदय होताना आपण पाहतोय, असं मोदी म्हणाले.

राणी चेन्नम्मा, मातंगिनी हाजरा, राणी लक्ष्मीबाई, कित्तूरच्या वीरांगना झलकारीबाईपासून ते अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्षेत्रात भारताची अस्मिता जपली. अनेक कठीण प्रसंगांनी भरलेल्या मध्ययुगीन काळातही या देशात पन्नाध्याय, मीराबाईसारख्या थोर स्त्रिया होत्या. आणि अमृत महोत्सवात देशाच्या ज्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची आपण आठवण करतोय, त्यातही अनेक महिलांनी बलिदान दिले आहे.

जेव्हा जग गडद अंधारात होते, स्त्रियांबद्दलच्या जुन्या विचारसरणीत अडकले होते, तेव्हा भारत माता शक्तीची देवीच्या रूपात पूजा करत असे. आमच्याकडे गार्गी, मैत्रेयी, अनुसूया, अरुंधती आणि मदालसा यांसारख्या विद्वान स्त्रियांनी समाजाला ज्ञान दिले, असे मोदी यांनी सांगितले.