PM मोदींनी दाखवला ‘गंगा विलास’ला हिरवा झेंडा… क्रूझ पर्यटनाबाबत केली मोठी घोषणा

नवी दिल्ली – ‘एमव्ही गंगा विलास’ या नदीतील सर्वात लांब क्रूझचे पर्यटन सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांचे उदघाटन करत या उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवला. यासोबतच गंगेच्या पलीकडे बांधलेल्या टेंट सिटीचेही उद्घाटन यावेळी करण्यात आले. तसेच क्रूझ टुरिझमबाबतही पंतप्रधानांनी मोठी घोषणा केली. ही क्रूझ वाराणसीवरून बांगलादेश असा मोठा प्रवास करणार आहे.

यासाठी 111 राष्ट्रीय जलमार्ग विकसित केले जात असल्याची माहिती देखील यावेळी पंतप्रधानांनी दिली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी जलमार्गही उत्तम आहेत आणि भाडेही कमी आहे. भारतातील नद्यांचा वापर वस्तूंच्या वाहतुकीसाठी केला जाऊ शकतो. विकसित भारत घडवण्यासाठी कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे. असं म्हणत पंतप्रधान मोदींनी सर्व क्रूझ प्रवाशांना प्रवासासाठी यावेळी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, भारताकडे सर्व काही आहे. भारत सर्वांचे मनापासून स्वागत करतो. हा क्रूझ प्रवास अनेक अनुभव घेऊन येणार आहे.क्रूझ पर्यटनाचा हा नवीन टप्पा आपल्या तरुणांना रोजगार देईल” असा आशावाद पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला. पूर्वी देशातील लोक अशा अनुभवासाठी परदेशात जात असत, मात्र आता त्यांना हा अनुभव देशातच घेता येणार आहे. आम्ही अनेक शहरांमध्ये अशीच यंत्रणा राबवणार असल्याचे देखील पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले.

टेंट सिटीबाबत पंतप्रधान म्हणाले, हे नव्या भारताच्या विकासाचे प्रतिबिंब आहे. गंगाविलासची सुरुवात साधी नाही. 32000 किमी पेक्षा जास्त लांबीचा हा जलमार्ग नदीच्या स्त्रोतांसाठी एक उदाहरण आहे. 2014 पासून भारत या प्राचीन शक्तीला आपली महान शक्ती बनवण्यात गुंतला आहे. 2014 मध्ये देशात फक्त पाच राष्ट्रीय जलमार्ग होते. आज 24 राज्यांमध्ये 111 राष्ट्रीय जलमार्ग विकसित करण्याचे काम सुरू आहे.