PM Modi’s U.S. visit Day 1 | पहिल्या दिवशी PM मोदींनी घेतली विविध मान्यवरांची भेट

न्यूयॉर्क :- अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या. यामध्ये अग्रगण्य अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ प्रो पॉल रोमर, गुंतवणूकदार आणि हेज फंडाचे सह-संस्थापक, ब्रिजवॉटर असोसिएट्‌स रे डॅलिओ आणि इतर प्रख्यात विचारवंत नेत्यांचा समावेश होता.

“कौन्सिक फॉर फॉरेन रिलेशन’चे अध्यक्ष मायकेल फॉमन, आशिया सोसायटी धोरण संस्था न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि मुत्सद्देगिरी विभागाचे उपाध्यक्ष डॅनियल रसेल,बोस्टन विद्यापिठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉय मॅक्‍स अब्राहम्स आदींचा समावेश होता. या सर्वांशी मोदींनी विविध विकासात्मक आणि भूराजकीय मुद्यांवर चर्चा केली.

अमेरिकन बौद्ध अभ्यासक, लेखक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते प्राध्यापक रॉबर्ट थर्मन यांनी देखील पंतप्रधानांची भेट घेतली आणि जागतिक आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी बौद्ध धम्माची मूल्ये मार्गदर्शक म्हणून कशी कार्य करू शकतात यावर आपापल्या दृष्टीकोनांची देवाणघेवाण केली.

अमेरिकन खगोल वैज्ञानिक, लेखक आणि वैज्ञानिक संवादक नील दे ग्रासे टायसन यांच्याबरोबरच्या भेटीदरम्यान युवकांमध्ये वैज्ञानिक वृत्ती रुडवण्याच्या मुद्यावर विचारांची देवाणघेवाण झाली. अंतराळ क्षेत्रात भारताची वेगाने होणारी प्रगती तसेच, भारताने हाती घेतलेली विविध अवकाश अभियाने यांच्याविषयीही त्यांनी सविस्तर चर्चा केली. भारताने नुकत्याच आणलेल्या राष्ट्रीय अवकाश धोरणाअंतर्गत, खाजगी क्षेत्रे आणि अभ्यासक यांच्यातील समन्वयाच्या संधी या विषयावरही दोघांमधे चर्चा झाली.

अमेरिकेतील कृषी, विपणन, अभियांत्रिकी, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांतील शिक्षणतज्ञांनी यावेळी मोदींचे स्वागत केले. भारताच्या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत संशोधन सहयोग आणि द्विपक्षीय शैक्षणिक देवाणघेवाण वाढवण्याच्या शक्‍यतांवर यावेळी चर्चा झाली.

शिक्षणतज्ञांनी पंतप्रधानांसोबत आपापल्या प्राविण्य क्षेत्रातील दृष्टीकोन आणि अनुभवांची माहिती दिली. तर अर्थतज्ज्ञ आणि धोरणकर्ते प्रा. पॉल रोमर यांनी पंतप्रधानांशी डिजिटल इंडियाचा प्रवास, आधारचा वापर आणि डिजीलॉकर सारखी अभिनव साधने, अशा सर्व विषयांवर चर्चा केली.