….तरीही पवार गप्प का..? नगरमधील सभेत मोदींचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल

अहमनदनगर : काँग्रेसचे लोक जम्मू-काश्मीरला वेगळं करायचं म्हणत आहेत, हे पाप त्यांचीच पैदाईश, मात्र शरद पवारांना काय झालयं?, देशाच्या नावावर तुम्ही काँग्रेस सोडले, पण आता दोन पंतप्रधान होणार यावर तुम्ही गप्प का? असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

अहमदनगर महायुतीचे उमेदवार सुजय विखें आणि शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अहमदनदर येथे आज पार पडली.यावेळी सभेला संबोधित करताना मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला.

काँग्रेसशी फारकत घेऊन वेगळे झालेले शरद पवार हे पुन्हा त्यांच्यासोबत आहेत. मात्र ते भारताकडे विदेशी चष्म्यातून बघत आहेत. शरद पवारांच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी आहे. हे नावही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आहे का. तुमचे सहकारी जाहीरपणे भारतात दोन पंतप्रधान करण्याच्या बाता करत आहेत. छत्रपतींच्या भूमितील असलेल्या शरद पवारांना झोप कशी येते?, असा सवाल मोदींनी केला.

नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी सरकारच्या काळात घोटाळे केले. सध्या महायुतीच्या सरकारने पाण्यासाठी केलेली कामं एकीकडे तर आघाडीचे घोटाळे आणि अजित पवारांचं लाजिरवाणं वक्तव्य दुसरीकडे. अशा गुन्ह्यांमुळे देशाच्या जनतेने काँग्रेसचं मन आणि नियत ओळखली आहे. त्यामुळेच जनेतेने आता काँग्रेसला हरवा, गरीबी हटवा तेव्हाच देश विकास करेल असा नारा दिला आहे.

यावेळी ते म्हणाले की, पाच वर्षात निर्णय घेणारं मजबूत सरकार जगाने पाहिलं. यापूर्वी देशात रिमोटवर चालणारं सरकार होतं. काँग्रेसच्या काळात देशात अस्थिरता होती. त्यामुळे देशाला प्रामाणिक चौकीदार हवा आहे की भ्रष्टाचारी नामदार? हे तुम्ही ठरवा.

मोदींनी महाराष्ट्रातील इतर सभेप्रमाणे महाराष्ट्रातील सभेच्या भाषणाची देखील मराठीत सुरूवात केली. शिर्डी साईबाबाच्या सानिध्यात असलेल्या या नगरीला माझे नमन. महाराष्ट्र आणि अहमदनगरच्या सर्व बांधवाना उद्याच्या रामनवमीच्या खूप शुभेच्छा. तुम्ही एवढ्या उन्हात इथे आल्याने माझ्यावरील कर्ज वाढलं, असं यावेळी मोदी म्हणाले.

Leave a Comment