‘पीएमपी’ची टाकी फुल्ल… आता 11 ठिकाणी सीएनजी पंप

पुणे – पीएमपी बसमध्ये सीएनजी भरण्यासाठी चालकांची होणारी कसरत आता कमी होणार. शहरात आणखी सहा ठिकाणी सीएनजी पंप सुरू होणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे शहरात 11 ठिकाणी बसमध्ये सीएनजी भरण्याची व्यवस्था असणार आहे. मुबलक प्रमाणात सीएनजी पुरवठा होणार असल्याने बसची टाकी फुल्ल करूनच बस रस्त्यावर धावणार असल्याने बस बंद पडण्याचे प्रकारही टळणार आहेत तसेच यातून पीएमपी चालकांचा मन:स्तापही कमी होणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीच्या हद्दीत सेवा दिली जाते. सध्या, पीएमपीला सुगीचे दिवस आले आहेत. प्रवाशांची संख्याही वाढली आहे पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या 2 हजार 89 बसपैकी 1 हजार 431 बस सीएनजीवर आहेत. तर सीएनजी भरण्यासाठी केवळ पाच डेपोमध्ये व्यवस्था आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ या पाचही डेपोत सीएनजी भरण्यासाठी बसची मोठी गर्दी होते. काहीवेळी सीएनजी पुरेसा न भरल्यामुळे चालक प्रवाशांना रस्त्यात उतरवून सीएनजी भरण्यासाठी जाण्याची वेळ येते. मात्र, यामध्ये प्रवाशांसह चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

हा त्रास कमी करण्यासाठी पीएमपीचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी “एमएनजीएल’च्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून इतर डेपो व स्थानकात सीएनजी पंप सुरू करण्याची विनंती केली होती. त्यानुसार एमएनजीएलकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानुसार सर्वेक्षण पूर्ण झाले असून, लवकर सहा ठिकाणी सीएनजी पंप तयार केले जाणार आहेत.

येथे होणार नव्याने पंप

  • निगडी, औंध, चऱ्होली, कात्रज, अप्पर इंदिरानगर, मार्केटयार्ड
  • या ठिकाणी सीएनजी भरण्याचे दोन किंवा तीन डिस्पेंसर बसविणार
  • चालकांना लांब अंतरावरील डेपोत सीएनजीसाठी जावे लागणार नाही