गुंतवणूकदार मालामाल ! पीएनजीएस गार्गी शेअरने दिला तब्बल साडेसात पट परतावा

नवी दिल्ली – पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. शेअर बाजारात नोंदल्या गेल्यापासून वर्षभराच्या आतच कंपनीचा शेअर तब्बल साडेसात पट वाढला आहे. शेअरनी दिलेल्या परताव्यामुळे गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. कंपनीचे बाजारमूल्यही दोनशे कोटी रुपयांच्या पुढे गेले.

पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरीचे शेअर्स बीएसईवर मंगळवारी, १ ऑगस्ट २०२३ रोजी १९.३७ टक्क्यांनी अप्पर सर्किटसह रु.२२६.८० च्या पातळीवर बंद झाला. कंपनीच्या शेअरला आज शेअर बाजारात सुरुवातीपासूनच फक्त खरेदीदार होते.

कंपनीची कामगिरी सातत्याने चांगली होत असल्याने गुंतवणूकदारांना या शेअरमध्ये अधिक रस निर्माण झाला आहे. डिसेंबरमध्ये पीएनजीएस गार्गीचा आयपीओ प्रतिशयर ३० रुपये किमतीने झाला होता. डिसेंबर २०२२ मध्ये शेअरची नोंदणी होताना तो दुपटीने वर खुला झाला होता. काहीच महिन्यापूर्वी कंपनीचे बाजार मूल्य १०० कोटी रुपयांच्या वर पोहोचले होते.