पिंपरी | तळेगावमध्‍ये पोलिसांची नाकाबंदी

तळेगाव स्‍टेशन, (वार्ताहर) – आगामी काळात येणारे सर्वधर्मियांचे सण आणि लोकसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी घेण्‍यात येत आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांकडून शहरात येणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी करण्‍यात येत आहे.

आगामी काळात २४ मार्च रोजी होळी, २५ मार्च रोजी धुलिवंदन, २९ मार्च रोजी गुड फ्रायडे, ३० मार्च रोजी रंगपंचमी ३१ मार्च रोजी ईस्‍टर संडे असे सण येणार आहेत. या सणांच्‍या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्‍हणून पोलीस खबरदारी घेत आहेत. त्‍याचाच एक भाग म्‍हणून तळेगाव शहरात येणाऱ्या मार्गांवर अचानक नाकाबंदी केली जात आहे.

या नाकाबंदीत वाहनांची व कागदपत्रांची कसून तपासणी केली जात आहे. येथील रस्‍त्‍यावरून जाणाऱ्या प्रत्‍येक वाहनाचा क्रमांक, चालकाचे नाव व मोबाइल क्रमांक पोलीस नोंद करून घेत आहेत.