Maratha reservation: शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड

जालना – जालना येथील अतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर आंदोलनाने व्यापक रूप घेतले आहे. राज्यातील अनेक भागात या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. काही ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येत असून काही ठिकाणी रास्तारोकोही करण्यात येत आहे. विविध पक्षांचे नेते लोकप्रतिनिधी आंदोलन कर्त्यांची भेट घेत आहेत.

अशातच अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी गेलेल्या शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे शरद पवार जाणार असल्याने औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचे एक पथक त्यांच्या ताफ्यात बंदोबस्तासाठी गेले होते. मात्र यावेळी काही अज्ञात लोकांनी डीवायएसपी सिध्देश्वर भोरे यांच्या शासकीय वाहनावर दगडफेक केली. तसेच गाडीला लाथा मारून नासधूस करण्याचा प्रयत्न केला. वाढता जमाव पाहता पोलिसांनी तेथून काढता पाय घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

दरम्यान, जालना येथे काल झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर अजूनही परिस्थिती नियंत्रणात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध भागात निषेध आंदोलने सुरु आहेत. धुळे सोलापूर महामार्ग बंद केला होता. परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बार्शी येथे मराठा समाजाच्या वतीने टायर जाळून निषेध करण्यात आला. तसेच नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथेही राज्य महामार्गावर टायर पेटवून या घटनेचा निषेध करण्यात आला. या घटनांचा एसटी वाहतूकीवर परिणाम झाला आहे. एसटी महामंडळाने अनेक फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी ठिकाठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावला आहे.

लाठीचार्ज प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया –

जालन्यातील घटना खरोखर दुर्दैवी आणि गंभीर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: त्याठिकाणी असलेल्या उपोषणकर्त्यांशी बोललो होते. आमचा विविध प्रकारे संवाद सुरू होता. त्यांनी उपोषण मागे घ्यावे, कारण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीरपणे काम करत आहे.

पण हा विषय न्यायालयाशी संबंधित विषय आहे. तो एका दिवसात सुटणार नाही. तो सोडवण्याकरता वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत, अशाप्रकारे आम्ही त्यांची समजूत काढत होतो. पण ते ऐकत नव्हते.

उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. ही राज्याची जबाबदारी आहे की, अशाप्रकारे उपोषण होत असेल, तब्येत खबार होत असेल तर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते. प्रशासन कालही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेले होते.

पण त्यांनी तुम्ही उद्या या, असे सांगितले. प्रशासन आज पुन्हा गेले आणि विनंती केली. पण आज पोलिसांना घेरून दगडफेक करण्यात आली. त्या दगडफेकीत 12 पोलीस जखमी झाले. त्यानंतर तिथे पोलिसांनी लाठीमार केला.

पण पोलिसांनी कुणी जखमी होऊ नये यासाठी प्रयत्न केला गेला. लाठीमार कमी झाला. तिथे पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी ते केले नसते, तर पोलीस पथकाला अतिशय वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले असते. राज्य सरकार या विषयी अतिशय संवेदनशील आहे.