भारतातून अखेर अमेरिकेत डाळिंब निर्यात सुरू

पुणे – तांत्रिक कारण देत अमेरिकेने सन 2017-2018 पासून भारतातून डाळिंब आयासीस बंदी होती. ती हटवण्यासाठी अपेडा व एन.पी.पी.ओ. (नॅशनल प्लॅंट प्रोटेक्शन आॅर्गनायझेशन) यांनी अमेरिकेच्या कृषी विभागाशी चर्चा केली. त्यावर अखेर दि.24 जानेवारी 2024 रोजी पासून अमेरिकेत भारतीय डाळींब पाठवण्यास सुरुवात झाली आहे.

अमेरिकन कृषि विभागाच्या मागणीनुसार आता संपूर्ण सुरक्षित अशा डाळिंबांची निर्यात सुरू झाली आहे. यामध्ये माईटवॉश, सोडियम हायपोक्लोराइट प्रक्रिया, वॉशिंग-ड्राइंग इ. प्रक्रिया करुन त्यांनी निश्चित केलेल्या मानांकानुसारच्या बॉक्समध्ये पॅकिंग करुन डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करूनच डाळींब निर्यात सुरू करण्यात आली आहे.

कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्र येथे अमेरीकन निरीक्षक यांच्या उपस्थितीत डोझ मॅपिंग करुन डाळींब निर्यातीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार पहिली शिपमेंट दि.24 जानेवारी रोजी रवाना झाली. यामध्ये 336 बॉक्सेसमधून 1,344 किलो डाळींब फ्लोरिडा शहरात पाठवण्यात आली.

याप्रसंगी एन.पी.पी.ओ. मुंबईचे असिस्टंट डायरेक्टर एन. के. मिना, अपेडा मुंबईचे सहाय्यक व्यवस्थापक पी. ए. बामने, निर्यातदार कौशल खक्कर, कृषि पणन मंडळाचे सहायक सरव्यवस्थापक सतीश वाघमोडे, व्यवस्थापक डॉ. केदार तुपे आदींच्या उपस्थितीत अमेरिकन निरीक्षक लुईस यांनी डाळिंबाच्या कंटेनरला हिरवा झेंडा दाखवला.

…म्हणून अमेरिकेतून आहे मागणी

भारतीय डाळिंबात कर्करोगापासून लढण्यासाठी लागणारे अॅन्टीऑक्सिडंट आहेत. अमेरिकेतील त्वचेच्या विकारांवरील उपचारासाठी मार्गदर्शक आहारात डाळिंबाचा समावेश आहे. कॅलिफोर्निया डाळिंबांच्या प्रजातीपेक्षा भारतीय डाळिंबाला जास्त मागणी आहे. सद्यस्थितीत तेथील डाळिंबांचा हंगाम संपत असल्याने भारतीय डाळिंबांसाठी अमेरिकन बाजारपेठ काबीज करण्यास वाव आहे, असे पणन मंडळाचे सहायक सरव्यवस्थापक सतीश वाघमोडे यांनी सांगितले.