Porsche Car Accident : पोर्शे कार अपघातप्रकरणी सुनील टिंगरेंची महत्वाची प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले….

Pune | Porsche Car Accident । Sunil Tingre – पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री पोर्शे कारने दुचाकीला धडक देत एक युवक आणि एक युवती अशा दोघांचा जीव घेतला. अल्पवयीन कार चालक हा दारू पिऊन गाडी चालवत होता. वेदांत अग्रवाल असे अल्पवयीन आरोपीचे नाव आहे. शनिवारी रात्री झालेल्या अपघातानंतर अवघ्या 15 तासांच्या आतमध्ये त्याचा सशर्त जामीन मंजुर झाल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.

वेदांत अग्रवाल चे वडील विशाल अग्रवाल हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यामुळे पैशांच्या बळावर प्रकरण दाबले जात असल्याचा आरोप काही जणांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह ठेवलं जात आहे. आरोपीचा एका पबमध्ये दारू पितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या सर्व प्रकरणानंतर आता लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वेदांत याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलीसही अॅक्शन मोडवर आले आणि वेदांतच्या वडिलांना म्हणजेच विशाल अग्रवाल यांना अटक केली. हे प्रकरण दाबण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर आरोप केले गेले.

मात्र आता प्रकरणी स्वतः सुनील टिंगरे यांनी भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘माझ्या मतदारसंघात घडलेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करतो. रात्री तीन वाजून 21 मिनिटांनी माझ्या पी एचा मला फोन आला की मोठा अपघात झाला आहे.

त्यानंतर अनेक कार्यकर्ते असल्याचा आणि विशाल अगरवालव यांचा देखील फोन आला की माझ्या मुलाला मारहाण झाली आहे. मी पोलिस स्टेशनला पोहचलो. त्यानंतर पोलीसांनी मला माहिती दिली. त्यानंतर मी पोलिसांना कायद्यानुसार कारवाई करायला सांगितलं. मृतांच्या नातेवाईकांशी देखील मी बोललो.

मी पब आणि बारच्या विरोधात नेहमीच भूमिका घेतलीय. राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्या आधी मी त्यांच्याकडे नोकरी करायचो. एवढाच त्यांचा आणि माझा संबंध आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना मी मदत केली. पोलिस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज खुले करण्याची मागणी देखील केली आहे.’ असं सुनील टिंगरे यावेळी म्हणाले.