‘पोस्टमन’ देणार हयातीचे प्रमाणपत्र; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची हेळसांड थांबणार

पुणे – केंद्र तसेच राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासनाकडून निवृत्तीवेतन (पेन्शन) मिळते. दरवर्षी प्रत्येक सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) पेन्शन विभागाकडे डिसेंबरपर्यंत सादर करावा लागतो. आता हा दाखला पोस्टमनही देऊ शकणार आहेत. पुणे ग्रामीण डाक विभागाकडून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हयातीचा दाखला वेळेत संबंधित विभागाकडे जमा न केल्यास निवृत्तीवेतन बंद होते. यासाठी त्या कर्मचाऱ्यांना जास्त पैसे देत एखाद्या खासगी संगणक केंद्रावरून हयातीचा दाखला तयार करावा लागत असे. तसेच इंटरनेट संबंधित अडचणी आल्यास अथवा सर्व्हर डाऊन झाल्याने त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तालुक्‍याच्या ठिकाणी नाहक हेलपाटे घालावे लागतात.

त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी पोस्टाने हा पुढाकार घेतला असून त्यासाठी आवश्‍यक असलेले डिव्हाइस कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यानुसार केवळ आधार क्रमांक आणि अंगठ्याचे ठसे देऊन जागेवरच नागरिकांना हयातीचा दाखला दिला जाणार असल्याची माहिती पुणे ग्रामीण डाक विभागाचे अधीक्षक बी. पी. एरंडे यांनी दिली.

“सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) पेन्शन विभागाकडे डिसेंबरपर्यंत सादर करावा लागतो. बॅंक अथवा नागरी सुविधा केंद्रात त्यासाठी स्वत: जावे लागते. मात्र, अनेक पेन्शनधारक आजारी असतात. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेगवेगळ्या बाबी लक्षात घेऊन ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.” – बी. पी. एरंडे, अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण