तेलंगणाचे सचिवालय पाडण्यास स्थगिती

 

 

हैदराबाद- तेलंगणाच्या सचिवालयाची जुनी इमारत पाडून तेथे नवीन इमारत उभी केली जाणार आहे. पण ही जुनी इमारत पाडण्यास हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. सोमवारी या विषयावर पुन्हा सुनावणी होऊन निर्णय घेतला जाणार आहे. सचिवालयाची सध्याची इमारत ही दहा लाख चौरस फूट जागेवर उभी आहे. ती तडकाफडकी पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली गेलेली नाही, असा आक्षेप घेत ही इमारत पाडण्यास बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका दोन ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

सध्या लागू असलेला साथीचे रोगविषयक कायदा, पर्यावरण कायदा आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या संबंधातील कायदा याचा कोणताही विचार न करता ही मोठी इमारत पाडणे उचित नाही असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. या आधी उच्च न्यायालयाने ही इमारत पाडण्यास विरोध करणाऱ्या अनेक याचिका एकत्रितपणे फेटाळून लावल्या होत्या. पण सध्या अस्तित्वात असलेल्या विविध कायद्यांचा आधार घेत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मात्र इमारत पाडण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

Leave a Comment