स्थापत्य विभागातील अभियंत्यांच्या बदल्यांना स्थगिती

  • राजकीय दबावापुढे आयुक्तांची सपशेल  माघार 
  • खुर्ची उबविणारे अधिकारी पुन्हा त्याच ठिकाणी

पिंपरी – अनेक वर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची बारा दिवसांपूर्वी बदली करण्यात आली. त्यामध्ये स्थापत्य विभागातील 5 उपअभियंता आणि 20 कनिष्ठ अभियंत्याचा समावेश होता. मात्र राजकीय दबावापुढे  सपशेल माघार घेत महापालिका आयुक्तांनी या बदल्यांबाबत पुन्हा घूमजाव केले आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधी नगरसेवकांच्या राजकीय दबावापुढे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माघार घेत उपअभियंत्यासह कनिष्ठ अभियंत्याच्या बदली आदेशाला बुधवारी( दि. 6)) तीन महिने स्थगिती दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी एकाच विभागात 7 वर्षांपासून अधिक काळ काम करत आहेत. अनेक वर्ष एकाच ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती प्रशासनाने मागविली होती. त्यामध्ये 25 विभागामध्ये एकूण 1200 हून अधिक अधिकारी, कर्मचारी एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम असल्याचे प्रशासनास दिसून आले. त्यानुसार उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक, लिपिक यांसारख्या अन्य पदांवर देखील अनेक वर्षे ठाण मांडून बसलेले अधिकारी, कर्मचारी आढळून आले.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी राजकीय नेत्यांसह पालिका पदाधिकाऱ्यांचा दबाव झुगारुन अनेकांच्या बदल्या डिसेंबर 2020 मध्ये केल्या. तसेच काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती देखील दिली. मात्र, स्थापत्य विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्याच्या तत्काळ बदल्या रद्द कराव्यात, याकरिता सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी गाऱ्हाणेवजा सूचना केली. तर आमदारांनीही आयुक्तांकडे तक्रार केली. यामुळे आयुक्तांवर राजकीय दबाव वाढू लागला होता. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी 25 उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्याचा 24 डिसेंबर 2020 रोजी केलेला बदली आदेशाला 31 मार्च 2021 पर्यंत स्थगिती आदेश दिला आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, स्थापत्य विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंता संवर्गातील अधिकारी व कर्मचारी 24 डिसेंबर 2020 च्या आदेशाने केलेले स्थानांतरण प्रशासकीय कारणास्तव 31 मार्च 2021 अखेर स्थगिती देत आहोत. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानांतरणाचे पूर्व विभागात तात्काळ रुजू होऊन कामकाज करावे, असेही म्हटले आहे.

Leave a Comment