अमेरिकेतील वादळात २२ ठार; शेकडो घरांचे, उद्योगांचे नुकसान

ह्युस्टन, (अमेरिका)  – मध्य आणि दक्षिण अमेरिकेला बसलेल्या वादळाच्या तडाख्यामध्ये किमान २२ जण ठार झाले आहेत. तर शेकडो घरे, उद्योगांचे नुकसान झाले आणि लाखो घरांचा वीज पुरवठा खंडीत झाला. टेक्सास, ओल्काहोमा, अर्कान्सास आणि केंटुकी या प्रांतांना मेमोरियल डे निमित्त असलेल्या सुटीच्या दिवशी या वादळाचा फटका बसला.

या प्रांतांमध्ये गेले काही दिवस प्रचंड उष्णतेच्या लाटेने सतावले होते. त्यातील साऊथ टेक्सास आणि फ्लोरिडामध्ये या उष्णतेच्या लाटेचा उच्चांक होता. आता ही विपरीत हवामानाची स्थिती सोमवारपासून पूर्वेकडील प्रांतांमध्ये जाणवू शकते, असा अंदाज आहे. यामुळे नॉर्थ कॅरोलिनापासून मेरीलॅन्डपर्यंतच्या प्रांतांमध्ये सुटीचा आनंद घेण्यासाठी बाहेरगावी जाणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वादळामुळे केंटुकी प्रांतात आणीबाणी जाहीर केली गेली आहे. या प्रांतात वादळाचे ५ बळी झाले आहेत. तर टेक्सासमधील क्रूक काऊंटीमध्ये ७ आणि अर्कान्सास प्रांतात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ओक्लाहोमाच्या मेएस काउंटीमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला.एका विवाह समारंभातील काही पाहुणेही या वादळात जखमी झाले. शनिवारी रात्रीपासून केंटुकीमधील मोठ्या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

वादळामुळे अनेक ठिकाणची झाडे कोसळली आहेत. मोबाईल आणि वीजेचे खांबही कोसळले आहेत. वीज पुरवठा नसल्यामुळे पाणी पुरवठाही विस्कळीत झाला आहे. २०२१ नंतर आलेले हे सर्वात भीषण वादळ होते, असे मानले जाते आहे. डिसेंबर २०२१ मध्ये आलेल्या वादळामुळे केंटुकीमध्ये ८१ जणांचा मृत्यू झाला होता.