अग्रलेख : डिजिटल दबावाचे बळी

गेल्या सुमारे दोन वर्षांच्या कालावधीमध्ये जगासह भारताला करोना महामारीने त्रस्त करून ठेवल्यामुळे डिजिटल व्यवहारांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि शैक्षणिक क्षेत्रही त्यापासून बाजूला राहिलेले नाही. उलट सर्वांत जास्त डिजिटल यंत्रणेचा वापर शैक्षणिक क्षेत्र करत आहे; पण याच शैक्षणिक क्षेत्रातील डिजिटल यंत्रणेच्या दबावाचे बळी कशाप्रकारे पडू शकतात याच्या दोन घटना गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात घडल्या आहेत आणि त्या विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत. 

पहिल्या एका घटनेत डिजिटल शिक्षणाच्या वाढत्या दबावामुळे एका मातेने आपल्या मुलाचा खून केला आहे, तर दुसऱ्या घटनेमध्ये एका मुलीने आपल्या मातेचा खून केला आहे. नाशिकमध्ये घडलेल्या पहिल्या घटनेप्रमाणे साडेतीन वर्षे वयाचा मुलगा डिजिटल अभ्यास सुरू असताना व्यवस्थित लक्ष देत नाही यामुळे संतप्त होऊन एका मातेने त्याचा उशीने नाक, गळा दाबून खून केला. नंतर आपण काय केले हे लक्षात आल्यानंतर तिने स्वतःही आत्महत्या केली.

दुसऱ्या घटनेत नवी मुंबईतील एका मुलीने आई सतत अभ्यासाचा तगादा लावत असल्याने आपल्या मातेचाच खून केला आणि आईच्याच मोबाइलवरून मेसेज पाठवून आई आत्महत्या करत असल्याचे भासवले. दोन्ही घटना अगदी टोकाच्या मानण्यात आल्या तरी राज्यातील कानाकोपऱ्यामध्ये पसरलेल्या शहरांमध्ये किंवा गावांमधील घरांमध्ये सध्या डिजिटल शिक्षणाचा जो दबाव आहे तो सर्वांनाच जाणवत आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही.

नाशिकमधील घटना तर विचार करायला लावणारी आहे. मुळात साडेतीन वर्षे वय असणाऱ्या मुलाकडून काय शिक्षणाची अपेक्षा ठेवली जाणार. हा मुलगा नियमितपणे शाळेत जरी गेला असता तरी त्याचे संपूर्णपणे लक्ष शिकण्याकडे असतेच असे नाही. या वयोगटातील मुलांना शिक्षणापेक्षाही इतर अनेक बाबींमध्ये रस असतो; पण केवळ डिजिटल माध्यमातून जो अभ्यास दिलेला आहे तो अभ्यास आपला मुलगा पूर्ण करत नाही या दबावामुळे संतापून या मातेला हे टोकाचे कृत्य करावे लागले.

महामारीच्या निमित्ताने का होईना 3 ते 5 वयोगटातील मुलांची शाळेत जाऊन शिक्षण घेण्याच्या सक्‍तीतून सुटका झाली आहे. तरी आपल्या पाल्यांनी या वयातही शिक्षण घ्यायला हवे या हव्यासामुळे पालकांनी डिजिटल शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आहे. या परिस्थितीमध्ये या वयोगटातील मुलांची एकाग्रता होत नसेल, तर पालक चिडतात आणि त्यातूनच अशा प्रकारच्या घटना घडतात. इतरांची मुले कसे व्यवस्थित शिकतात; पण माझाच मुलगा कसा काय शिकत नाही, या स्पर्धात्मक भावनेतूनच अशा घटना घडतात हे वास्तवही आता समाजातील अनेक पालकांनी स्वीकारायला हवे.

या वयोगटातील विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता दाखवली नाही तर काहीही फरक पडत नाही. कारण अजून त्यांच्या नियमित शिक्षणाला सुरुवातही झालेली नाही; पण समाजातील स्पर्धात्मक वातावरण यामुळेच अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत हेच मान्य करावे लागेल. दुसऱ्या घटनेचा विचार करता मुलगी पंधरा वर्षांची म्हणजे साधारण दहावी शिकणारी होती. तिच्यासाठी अभ्यास हा निश्‍चितच महत्त्वाचा होता. पण केवळ आई सतत अभ्यासाचा तगादा लावते म्हणून तिने अशा प्रकारचे टोकाचे पाऊल का उचलले, याचाही विचार करण्याची गरज आहे.

या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये नेहमीचे शिक्षण बाजूला पडून घरी बसून शिक्षण घेण्याची पद्धती विकसित झाल्यामुळे अनेकांमध्ये मानसिक दबाव आला आहे. शिक्षणामध्ये आपण यशस्वी होऊ की नाही याबाबत अनेकांच्या मनात आत्मविश्‍वास राहिलेला नाही. मोबाइल किंवा लॅपटॉप समोर ठेवून अभ्यास करणे किंवा डिजिटल वर्गांना हजेरी लावणे अनेकांना नकोसे वाटते, हे तथ्यही स्वीकारावे लागणार आहे.

अभ्यासासाठी किंवा वर्गांना हजेरी लावण्यासाठी कंटाळा करणाऱ्या या मुलीला आईने सतत तगादा लावला त्यामुळे चिडून तिच्या हातातून हे कृत्य घडले, असे दिसते. या घटना प्रातिनिधिक स्वरूपाच्या मानल्या, तर राज्यातील आणि देशातील समाजशास्त्रज्ञांना आता गांभीर्याने याचा विचार करावा लागणार आहे. विशेषत: राज्य सरकारच्या शिक्षण खात्याला नियमित स्वरूपाचे शिक्षण लवकरात लवकर सुरू करण्याबाबत प्राधान्याने विचार करावा लागणार आहे.

सरकारने फक्‍त पुढील आठवड्यामध्ये शहरी भागात आणि ग्रामीण भागांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू केला आहे. महाविद्यालयीन शिक्षण नियमित पद्धतीने सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, ही आश्‍चर्याची बाब आहे. खरं तर महाविद्यालयीन वयोगटातील मुलांना जाण असते आणि सर्व नियमांचे पालन करण्याची जाणीवही त्यांच्याकडे असते. तरीही सरकारने अद्याप महाविद्यालयीन शिक्षण आणि उच्च शिक्षण वंचित ठेवले आहे.

समाजातील इतर सर्व व्यवहारच आता खुले झाले असल्याने शिक्षण क्षेत्राला अशाप्रकारे बंद ठेवणे आता परवडणारे नाही हे राज्य सरकारने लक्षात घ्यायला हवे. डिजिटल पद्धतीच्या शिक्षणाची अद्याप आपल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना तेवढी सवय झालेली नाही. त्यामुळेच अशा प्रकारचा दबाव वाढत चालला आहे. या प्रकारच्या टोकाच्या घटना घडल्याचे प्रकार जरी कमी असले तरी बहुतेक घरांमध्ये डिजिटल शिक्षणाचा दबाव जाणवत आहे.

याप्रकारे डिजिटल शिक्षण घेण्याची ऐपत नसल्याने गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक गरीब मुलांनी आणि विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. राज्याच्या ग्रामीण भागांमध्ये जेथे मोबाइलचे नेटवर्क व्यवस्थित कार्यरत नसते तेथील हजारो विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा लाभ मिळत नाही. त्यांच्यावरील शैक्षणिक दबाव वाढत जातो, हे वास्तवही यानिमित्ताने स्वीकारायला हवे.

मुळात यावर्षी दहावी आणि बारावी या महत्त्वाच्या इयत्तांची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करण्यात आल्यामुळे त्यांच्यावरील एक मानसिक दबाव आधीच वाढलेला आहे. आता त्यांना पुढील शिक्षण अतिशय व्यवस्थित आणि खुल्या वातावरणात घेण्यासाठी शैक्षणिक दरवाजे खुले करण्याचा निर्णय सरकारला घ्यावाच लागेल. अन्यथा डिजिटल शिक्षणाचा हा दबाव समाजातील कोणत्याही घटकाला पेलवणार नाही.