जीवघेण्या मलेरियावरील लस तयार; आता मलेरियामुळे होणार नाही मृत्यू

जिनिव्हा – जीवघेण्या मलेरिया आजारावरील जगातील पहिल्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे. यामुळे मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंवर नियंत्रण राखण्यात यश येणार आहे. मलेरियाचे सर्वाधिक बळी आफ्रिकन देशांमध्ये जातात. सामान्यपणे दर मिनिटाला एका लहान मुलाचा मलेरियामुळे जीव जातो.

जगातील एकूण मृत्यूंपैकी अर्धे मृत्यू केवळ आफ्रिकन देशांमध्ये होतात. यातील एक तृतीयांश मृत्यू एकट्या नायजेरियात होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार हे धक्कादायक वास्तव अगोदरच समोर आले आहे. तसेच वर्षभरात किमान चार लाख लोक मलेरियाला बळी पडतात असेही ही आकडेवारी सांगते.

औषध कंपनी जीएसकेने तयार केलेल्या या लसीचे घाना, केनिया आणि मलावी या देशांमध्ये डोस देण्यात आले. त्यांचं परिक्षण केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने या लसीला अखेर व्यापक वापरासाठी मान्यता दिलीय. तसेच सहारन आफ्रिकन देशांमधील लहान मुलांवर या लसीच्या वापराची शिफारस केली आहे. दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना या लसीचे चार डोस देण्यात येणार आहेत.

एप्रिलमध्ये ब्रिटनच्या ऑक्‍सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी त्यांची मॅट्रीक्‍स-एम ही लस 75 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक परिणामकारक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मलेरियाविरोधातील लढ्याला चांगलीच बळकटी मिळाली. आताच्या नव्या घडामोडींमुळे वैज्ञानिकांना मलेरियावरील आणखी लसी निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी आशा जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.