पिंपरी | खोपोली शहरात मान्सून पूर्व पावसाची हजेरी

खोपोली , (वार्ताहर) – गेल्या दोन दिवसांपासून खोपोली शहरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उष्णतेमध्ये प्रचंड वाढल्याने नागरिकसुध्दा पावसाच्या प्रतीक्षेत होते. त्याच गुरुवारी (दि. ६) दुपारी विजांच्या कडकडाटात ढगांच्या गडगडाटासह मान्सून पूर्व पावसाची हजेरी लावली. त्यामुळे खोपोली शहर ओलाचिंब झाले तर, परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला.

मे महिन्यापासूनच अतीउष्मा वाढल्याने नागरिक चिंतेत होते. पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यात गुरुवारी झालेल्या पावसाने अतापर्यंत खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना पुन्हा वेग आला असून शेतातील लगबग जोमात सुरू झाली आहे.

मागील वर्षीच्या दोन्ही हंगामात झालेले नुकसान यंदा तरी भरून निघेल, या आशेने शेतकरी मोठ्या उत्साहाने जूनच्या प्रारंभीच खरीपासाठी तयार झाला आहे. मान्सून पूर्व पावसाने हवेत काहीसा गारवा आल्याने खोपोलीकर काहीसे सुखावलेले दिसले.