पंतप्रधान मोदींची इस्त्रो भेट; मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती, विरोधकांची टीका अन्…

नवी दिल्ली : चांद्रयान-३ यशस्वीरीत्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचल्यानंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदी आज सकाळी सहा वाजता ग्रीसवरुन थेट बंगळुरुमध्ये उतरले. त्यांनी याठिकाणी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. त्यांच्या कामाबद्दल कौतुक करुन त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.  दरम्यान, पंतप्रधान मोदींना विमानतळावरुन घेण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल कोणीही आले नव्हते. तसेत इस्त्रो संस्थेच्या भेटीत सुद्धा पंतप्रधान मोदी यांच्या सोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा राज्यपाल उपस्थित नव्हते. यावरुन विरोधकांनी टीका केली होती. यावर पंतप्रधानांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

ग्रीस ते बंगळुरु असा त्यांचा प्रवास किती तासाचा होईल त्यांना माहिती नव्हतं. त्यामुळे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री यांना पंतप्रधानांना घेण्यासाठी विमानतळावर न येण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या होत्या. नक्की विमान कधी बेंगळुरुमध्ये दाखल होईल याची कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच सकाळी लवकर येण्याचा त्रास नको म्हणून त्यांना न येण्याचा निरोप आपणच दिला असल्याचे मोदींनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी एचएएल विमानतळावर हजारो लोकांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, प्रवास मोठा असल्याने येण्याची निश्चित वेळ माहिती नव्हती. त्यामुळे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री सिद्धारमय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना न येण्यास सांगितले होते.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना न बोलावल्यामुळे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी टीका केली. ते म्हणाले की, सिद्धारमय्या आणि शिवकुमार यांना एचएएल विमानतळावर मोदींच्या स्वागतास येण्यास मनाई करण्यात आली होती. सिद्धारमय्या यांनी मोदींच्या अगोदर इस्त्रो शास्त्रज्ञांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले होते. त्यामुळे मोदी त्यांच्यावर नाराज होते. त्यामुळे त्यांनी असे कृत्य केले असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.