पृथ्वी शॉ सेल्फी वाद प्रकरण; सपना गिलची मुंबई उच्च न्यायालयात धाव, केले गंभीर आरोप…

मुंबई – गेल्या महिनाभरापासून पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर सपना गिल हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होत. आजही या प्रकरणाची चांगलीच चर्चा होताना दिसून येते. झालं असं की… गेल्या महिन्यात पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र क्‍लबमध्ये गेले होते. यावेळी काही चाहत्यांसोबत हा वाद सुरु झाला. या प्रकरणात महिला चाहतीने पृथ्वी शॉकडे सेल्फी घेण्याचा आग्रह धरला होता. यादरम्यान एकदा सेल्फी घेतल्यानंतर चाहती आणि तिच्या मित्रांनी अजून एक सेल्फी घेण्यासाठी आग्रह धरला.

मात्र यावेळी पृथ्वीने नकार दिला. यानंतर सेल्फी घेणाऱ्या चाहत्यांनी पृथ्वी शॉ याच्या मित्राच्या गाडीवर हल्ला केला होता. या प्रकरणी सपना गिलसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सपना गिलसह चौघांना जामीन देखील मंजूर करण्यात आला. मात्र, आता सपना गिलने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

पृथ्वी शॉचे प्रभावशाली लोकांशी संगनमत असल्याचा आरोप सपना गिलने केला असून तिच्यावर लावलेले आरोप खोटे आहेत. शॉचा मित्र असलेल्या तक्रारदाराने सध्याच्या एफआयआरमध्ये आपल्याला मुद्दाम गोवले असल्याचा आरोपही तिने केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आल्याचं दिसून येत आहे.

शॉच्या निर्देशानुसार कायद्याचा गैरवापर करून त्याने वैयक्तिक सूड घेण्यासाठी, गिलला त्रास देण्यासाठी आणि फसवण्यासाठी कायद्याचा वापर करत आहे. सपना गिल हिच्यावर गुन्हा नोंदवू नये, असे निर्देश पोलिसांना द्यावेत; अशी विनंती या याचिकेत तिच्याद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान, पृथ्वी शॉने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये गिलवर भारतीय दंड संहिता अंतर्गत दंगल, खंडणी आणि गुन्हेगारी धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 17 फेब्रुवारी रोजी याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आणि 20 फेब्रुवारी रोजी मुंबई न्यायालयाने जामीन मंजूर होईपर्यंत तिला कोठडीत ठेवण्यात आले होते. जामीन मिळताच तिने लगेच पृथ्वी शॉवर धक्कादायक आरोप करत एफआयआर दाखल केला.