Lok Sabha Election 2024 : ‘निवडणुकीनंतर ‘ते’ दोन पक्ष संपुष्टात येतील…’; चव्हाणांच्या विधानाने खळबळ

Prithviraj Chavan | Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले असून तिसरा टप्प्यासाठी मंगळवारी (7 मे) मतदान पार पडणार आहे. अशातच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील राजकारणाबाबत मोठा दावा केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठे बदल होताना दिसतील, असा दावा करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बाजूने आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात एक सुप्त लाट असून निवडणुकीचे टप्पे वाढत आहेत, तसतशी ती सुप्त लाट उघड व्हायला लागली आहे. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल, अशा प्रकारचा निकाल लागेल.

शरद पवारांशी झालेल्या चर्चेत अपेक्षित नसणाऱ्या जागा देखील निवडून येतील, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये असलेल्या प्रत्येकी तीन म्हणजेच सहा पक्षांपैकी दोन पक्ष निवडणुकीनंतर संपुष्टात येतील. दोन पक्ष एकतर विलीन होतील किंवा अस्तित्वात नसतील, असा दावा त्‍यांनी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर निशाणा साधताना म्हटले की, प्रचाराची पातळी फारच खाली गेली आहे. उमेदवार आणि प्रचारकांच्या पातळीवर ते समजून घेता आलं असतं, पण पंतप्रधानांनी प्रचाराची पातळी खाली नेली, हे आश्चर्यकारक आहे.

लोकांच्या मुद्यावर चर्चा करण्याऐवजी ते वैयक्तिक टीकाच जास्त करताना दिसत आहेत. शरद पवारांबद्दल पंतप्रधान भटकती आत्मा म्हटल्यानंतर भाजपाला मोदींचे फोटो असलेले पोस्टर्स काढावे लागले. इतका लोकांमध्ये राग आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.