पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, ‘४०० पार भाजपाच्या अंगलट येणार’

मुंबई – अजित पवार गटाची लोकसभेची एकही जागा निवडून येणार नाही असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात देशासह महाराष्ट्रातील राजकीय समीकरणावर भाष्य केले आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणाबद्दल बोलतांना त्यांनी अनेक मोठे दावे केले. ते म्हणाले, ”अजित पवार गटाची लोकसभेची एकही जागा निवडून येणार नाही. तर शिंदे गटाच्या तीन-चार जागा निवडून येण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 12 जागांवर यश मिळू शकते. विशेषतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने लोकांची सहानुभूती आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला 32 ते 35 जागांवर विजय मिळू शकतो”, असा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

याशिवाय यावेळी त्यांनी भाजपवर देखील टीका केली आहे. ते म्हणाले, ”विविध राज्यांमधून आढावा घेतल्यानंतर भाजपला पुन्हा सत्ता मिळणे अवघड असल्याचे दिसत आहे. देश आणि राज्यात भाजपविरोधी वातावरण दिसत आहे. परिणामी गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सहजपणे सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला सध्या बहुमताचा 272 चा आकडा गाठणेही अवघड दिसत आहे”,असे म्हणत चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपाच्या जागा वाढणे अशक्य
याशिवाय देशात इंडिया आघाडीला 240 पेक्षा जास्त जागांवर यश मिळणार असल्याचा मोठा दावा चव्हाण यांनी केला. देशपातळीवर इंडिया आघाडीलाही चांगले यश मिळेल. इंडिया आघाडीला देशभरात साधारण 240 ते 260 जागा मिळतील. याउलट 2019 च्या तुलनेत एकाही राज्यात भाजपच्या जागा वाढतील, असे दिसत नाही. ‘अबकी बार चारसो पार’ ही स्वत:चीच घोषणा पंतप्रधान मोदींच्या अंगलट आली आहे”, असा खोचक टोलाही चव्हाण यांनी लगावला आहे.

विकसित भारताबाबत स्पष्टता नाही
याशिवाय चव्हाण पुढे म्हणाले, ”यंदाच्या निवडणुकीत बेरोजगारी, भ्रष्टाचार, संविधान बचाव हे मुद्दे प्रभावी ठरत आहे. या मुद्द्यांवर मोदी आणि भाजपला स्पष्टीकरण देता आलेले नाही. भाजपकडून 2047 सालच्या विकसित भारताची संकल्पना मांडण्यात आली आहे. मात्र, त्याविषयी भाजपकडे स्पष्टता किंवा कोणतेही ठोस धोरण नाही”, असे मत देखील चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.